
Conspiracy Behind Ajit Pawar Death In Plane Crash: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या विमान अपघाता प्रकरणामध्ये घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचा संदर्भही राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. अजित पवारांना भाजपापासून फारकत घ्यायची होती असंही राऊतांनी म्हटलं आहे. “अजित पवारांना जे ओळखतात ते सांगू शकतात की त्यांनी भाजपाच्या अजेंड्यावर काम केलं नाही. सत्तेसाठी एकत्र आले. त्यांच्यावर भाजपाने काही संकटं लादली. घोटाळ्याचे आरोप झाले. ईडी, सीबीआय मागे लावलं. इतर राजकीय पक्ष जे करतात तेच त्यांनी केलं. ते भाजपाला सरेंडर झाले. शहाणपणाने आपल्यावरील फाइल क्लिअर करुन घेतल्या. पुन्हा एकदा ते मूळ प्रवाहात, स्वगृही येण्याची तडफड करत होते. त्यांनी कधीच भाजपाचा अजेंडा बटेंगे तो कटेंगे, हिंदू-मुस्लमान, एक हे तो सेफ है, दंगली यावर कधीही काम केलं नाही. राजकारण केलं नाही. दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
हे प्रकरण साधं नाही हे पवारांना…
शरद पवारांनी अजित पवारांचा मृत्यू हा विमान अपघातातच झाला असून त्याचं राजाकरण करु नये असं म्हटलं होतं. यावर बोलताना राऊतांनी, “हे प्रकरण साधं नाही हे पवारांनाही कळेल,” असं विधान केलं आहे. अजित पवारांना स्वगृही परतायचं होतं आणि हा भाजपासाठी मोठा धक्का ठरला असता असंही राऊत म्हणालेत.
अजित पवार वारंवार सांगत होते माझ्याकडे…
“अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भाजपाचा पराभव. देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारा तो निर्णय ठरला असता. अजित पवार मागे फिरले असते तर भाजपाची दहशत मोडून गेली असती. अजित पवार वारंवार सांगत होते माझ्याकडे भाजपाच्या घोटाळ्यांची फाईल आहे, तो मी उघड करेन. हे त्यांनी 15 जानेवारीला सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसांमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. हे रहस्य आहे. हे पाहून जस्टीस लोयाची आठवण झाली. मी कोणावर आरोप करत नाही. पण या लोकांच्या मनातील शंका आहे. मिटकरींचे प्रश्न मी वाचले आणि ऐकले. ते गंभीर स्वरुपाचे प्रश्न आहेत,” असं राऊत यांनी म्हटलं आहे. अजित पवारांसारखा महत्त्वाचा व्यक्ती विमानात बसताना त्याच्या मूलभूत सुरक्षा तपासण्या नाहीत तर लोकांच्या मनात शंका येणारच ना? असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
पवार-पाटलांचा नाही, गोयल, पटेल, पारेखांचा पक्ष
“आता अजित पवारांचा पक्ष 100 टक्के अमित शांहांचा गुलाम झालेला पक्ष आहे. लोक अजूनही सैरभैर आहेत. निवडणूक आयोग अमित शाहांचा मांडलीक झाला आहे. अजित पवारांचा पक्ष पवार-पाटलांचा पक्ष राहिलेला नाही. तो आता गोयल, पटेल, पारेख यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे. तो मराठमोळा चेहरा असलेला पक्ष होता. मूळ पक्ष शरद पवारांचा. अमित शाहांनी डाका टाकून तो त्यांच्या हाती दिला. सुरुवातीला तो शाहांचा होता आता पटेलांचा होता. प्रादेशिक अस्मिता जपणाऱ्या पक्षाचा भाजपाने गिळला. या पक्षाचा घास घेतला. याचा त्या पक्षातील मराठी आमदारांना आनंद होत असेल तर त्यांनी स्वत:ला मराठी समजू नये ही आमच्या पक्षाची भूमिका आहे,” असं राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



