
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला पाच दिवस उलटले असताना महाराष्ट्रात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत वर्तुळात वेगवान घडामोडी सुरूच आहेत. या काळात पवार कुटुंबीयांना वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवत तातडीने सार्वजनिक जीवनात सक्रिय व्हावे लागले. अशा परिस्थितीत अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांची एक भावनिक व्हॉटसअॅप स्टेटस पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. जय पवार यांनी आपल्या स्टेटसला वडिलांसोबतचे दोन फोटो ठेवले आहेत. त्या फोटोंसोबत त्यांनी लिहिलेला मजकूर अनेकांच्या मनाला भिडत आहे. तुमची खूप आठवण येतेय. डॅड, काश वेळ थांबली असती. मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो. मिसिंग यू अ लॉट डॅड! असे शब्द जय पवार यांनी लिहिले आहेत. या स्टेटसचा स्क्रीनशॉट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून, अनेकांनी त्यावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अजित पवार हे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती येथे येत असताना 28 जानेवारी रोजी त्यांच्या विमानाचा अपघात झाला होता. धावपट्टीवर उतरताना विमान कोसळले आणि त्यानंतर झालेल्या स्फोटात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने राज्यभरात शोककळा पसरली आणि राजकीय वर्तुळात मोठा धक्का बसला. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत मोठी गर्दी उसळली होती. विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. या अंत्यसंस्काराच्या वेळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या अखत्यारीतील उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक विकास ही खातीही सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली. या शपथविधीनंतर त्यांनी कराड येथे जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि नंतर पुन्हा बारामतीत परतल्या. सुनेत्रा पवार मंगळवारी काटेवाडी येथे असणार आहेत. काटेवाडीतील ‘सहयोग’ या निवासस्थानी पवार कुटुंब दुपारी चार वाजेपर्यंत सांत्वनपर भेटी स्वीकारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या काळात अनेक नागरिक, कार्यकर्ते आणि नेते पवार कुटुंबीयांची भेट घेत शोक व्यक्त करत आहेत. राजकीय घडामोडींच्या वेगात वैयक्तिक भावनांना जागा मिळणे कठीण असते. मात्र जय पवार यांच्या स्टेटसमधून मुलाची वडिलांविषयीची ओढ आणि दु:ख स्पष्टपणे दिसून येत आहे. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक वेदना यांचा संगम या घटनेतून प्रकर्षाने जाणवत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



