
Best Travel Tourism satara : पर्यटनाची आवड असणाऱ्या मंडळींचं एक स्वप्न असतं, ते म्हणजे संपूर्ण देश फिरून पालथा घालण्याचं. पण, देशाटन करण्यापूर्वी महाराष्ट्र राज्य तुम्ही पूर्णत: पाहिलं आहे का? विविध भौगोलिक रचना असणाऱ्या या एकट्या महाराष्ट्रातच मातीपासून ते वनस्पती आणि वातावरणामध्ये इतकं वेगळेपण पाहायला मिळेल, की इथंच भटकंतीसाठीचा वेळ पुरेसा पडणार नाही. प्रकाशझोतात असणाऱ्या पर्यटनस्थळांशिवायही राज्यात फिरण्यासारखी अशी अनेक निवांत ठिकाणं आहेत, जिथं गेलं असता वेळोवेळी भारावून जायला होतं.
सातारचा समुद्र… कधी पाहिलाय का?
असंच एक ठिकाण आहे सातारा जिल्ह्यात. वाईपासून साधारण 9 किमी आणि पुण्यापासून 96 किमी अंतरावर असणाऱ्या या ठिकाणी पोहोचतानाच त्याच्या सौंदर्याची झलक दिसण्यास सुरुवात होते. स्पितीच्या खोऱ्यात हिमाचलमध्ये वाहनं काहीशी दूर उभी करून चंद्रतालपर्यंत जाण्याची वाट सापडते अगदी त्याचप्रमाणे इथंसुद्धा वाहन काहीसं दूर उभं करून मूळ ठिकाणापर्यंत जावं लागतं. काही मंडळी वाहनं अगदी पुढपर्यंत नेतात, मात्र निसर्गाला धक्का न पोहोचवण्यासाठी वाहन दूर ठेवणंच उत्तम पर्याय.
साताऱ्यातील समुद्रच भासणारं हे ठिकाण म्हणजे धोम धरण. डोंगरांच्या कुशीत असणाऱ्या या धोम धरणाच्या या तलावाचा व्यास आणि त्याचा काठ पाहिला असता आपण जणू समुद्रकिनारीच उभे आहोत याचा भास होतो. इथं वाऱ्याचा वेग इतका प्रचंड असतो, की धोम सरोवरातील पाणी फार क्वचितच स्थिर असल्याचं पाहायला मिळतं. इथ पाण्यावर उठणारे तरंग पाहता जणू वारा या पाण्यासह खेळत असल्याचच पाहायला मिळतं.
पर्यटनाच्या दृष्टीनं आणि अनेकांचाच धोम तलावापाशी येण्याचा कल पाहता इथं चहापाण्याची अगदी छोटेखानी दुकानं आहेत. इतकंच नव्हे तर तलावासमोरील रस्त्याला लागूनच राहण्यासह खाण्यापिण्याची उत्तम सोय देणारे रिसॉर्ट, हॉटेल अशाही सुविधा इथं पाहायला मिळतात. पावसाळ्यात तुलनेनं या तलावाचा जलस्तर बराच वाढतो. त्यामुळं हिवाळा आणि उन्हाळ्यात इथं भेट देणं सुरक्षित. पावसाळ्यात आलं असता येथील निसर्गाचं कमाल रुप मन भारावतं मात्र तरीही निसर्गाशी खेळखंडोबा नको, म्हणून इथं पावसात यायचं झाल्यास सावधगिरी बाळगणंही तितकंच महत्त्वाचं.
धोम धरणाविषयी थोडी माहिती…
ठिकाण: सातारा जिल्ह्यातील धोम गावाजवळ, कृष्णा नदीवरील धरण. 1968 ते 1977 दरम्यान हे धरण बांधण्यात आल्याची माहिती. वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि नजीकच्या गावांना पाणीपुरवठा करण्यासमवेत वीज निर्मितीच्या हेतूनं त्याची बांधणी करण्यात आली. धोम धरणाच्या बॅकवॉटरमुळं धोम सरोवर (Dhom Lake) तयार झालं असून ते साधारण 20 किमी लांब आहे. इथं बोटींग (स्पीड बोट, बनाना बोट), वॉटर स्पोर्ट्स, घोडेस्वारी, कॅम्पिंग अशा सुविधा पुरवण्यात येतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



