
Ajit Pawar Death In Plane Crash: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूला आज एक आठवडा पूर्ण झाला. अजित पवारांंचं विमान बारामती विमानतळाजवळ कोसळलं आणि या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातासंदर्भात आता वेगवेगळे दावे केले जात असतानाच ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्या गावातील सरपंचाने सांगितलेलं घटनाक्रम हादरवून सोडणार आहे. विमान अपघातानंतरही विमानातून प्रवास करणारे काहीजण जिवंत होते असं या विधानावरुन स्पष्ट होतं. या सरपंचाने नेमकं काय सांगितलं आहे जाणून घेऊयात…
कोणत्या गावात कोसळलं हे विमान?
अजित पवारांच्या विमानाचा अपघात धावपट्टीजवळ झाला असला तरी ते ठिकाण बारामती विमानतळापासून 2 किलोमीरटवर आहे. अपघात बारामती विमानतळाजवळील गोजुबावी (Gojubavi) गावाच्या परिसरात झाला. या गावाला तशी विमानांची सवय आहे. गोजुबावी गावाचे सरपंच कल्याण आटोळे यांनी अपघाताच्या दिवशी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे. पोलिसांना सर्वात आधी या अपघाताबद्दल माहिती देणारे कल्याण आटोळेच होते. प्रसारमाध्यमांशी बोलताना कल्याण आटोळेंनी नेमका घटनाक्रम सांगितला आहे.
पडले… पडले म्हणत गावकरी विमान क्रॅश झालेल्या ठिकाणी पोहोचले
“विमानतळावर विमान येणे-जाणे आमच्यासाठी आता नवीन नाही. त्या दिवशी ‘दादा’ (अजित पवार) येणार आहेत हे माहिती होते. पण अचानक विमानाचा वेगळा आवाज आला. पाहिले तर विमान डाव्या बाजूला कलले आणि विमान जमिनीवर कोसळले. विमान कोसळल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात धूर निघत होता,” असं कल्याण आटोळे म्हणाले. विमान कोसळल्याचं लक्षात येताच गावातील अनेकजण विमान कोसळलेल्या ठिकाणाकडे मदतीसाठी धावले. “पडले.. पडले… असं ओरडत गावकरी मोटारसायकलीवरुन घटनास्थळाकडे धावले,” असं कल्याण आटोळेंनी सांगितलं.
विमानाचा दरवाजा उघडा होता आणि कोणीतरी…
कल्याण आटोळेंसहीत गावकरी अपघात झालेल्या ठिकाणी पोहोचल्यानंतर समोर काय दिसलं याबद्दलही त्यांनी सांगितलं आहे. “विमानाचा दरवाजा उघडा होता. त्यातून कोणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, असं आम्हाला दिसलं. तितक्यात मोठा स्फोट झाला, आमच्या नजरेसमोर होत्याचे नव्हते झाले. आगीचे लोळ आणि आवाज इतके भीषण होते की आम्ही सगळेजण मागे पळालो,” असं कल्याण आटोळे म्हणाले.
तीन पुरुष आणि एका महिलेचा मृतदेह गावकऱ्यांनीच काढला बाहेर
अजित पवारांचं या अपघातात निधन झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर कल्याण आटोळेंना अश्रू अनावर झाले. “या स्फोटाने अजितदादांना आमच्यापासून हिरावून घेतले. हा धक्का इतका मोठा आहे की त्यामधून अजून सावरता येत नाही,” असंही कल्याण अटोळे म्हणाले. गावकऱ्यांनीच जळणाऱ्या विमानाच्या अवशेषांमधून चार जणांना बाहेर काढले. यामध्ये तीन पुरुष आणि एक महिला होती. अजित पवारांचा अंगरक्षक वीदिप जाधव यांची ओळख पटवता आली. तर अजित पवारांचा मृतदेह सर्वात आधी त्यांचे निकटवर्तीय सहकारी आणि त्यांना विमानतळावर रिसिव्ह करण्यासाठी आलेल्या किरण गुजर यांनी ओळखला. अनेक गावकऱ्यांनी विमान विचित्र आवाज करत घिरट्या घालत कोसळल्याचे सांगितले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



