
सातारा येथे येत्या दिनांक 2 व 3 मे रोजी होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मराठीतील ख्यातनाम गायक शाहीर आणि विद्रोही शाहिरी जलस्याचे प्रवर्तक तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनापासून संबंधित असलेले शाहीर संभाजी भगत यांची निवड करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती राहुरी येथे झालेल्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. बाबुराव गुरव व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पत्रकार परिषदेला एडवोकेट सुभाष पाटील, संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष व सहस्वागताध्यक्ष हभप डॉ. सुहास महाराज फडतरे, कार्याध्यक्ष कॉ. विजय मांडके, सरचिटणीस एडवोकेट राजेंद्र गलांडे, प्रा. गौतम काटकर आदी उपस्थित होते. क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्षानिमित्त हे संमेलन साताऱ्यात घेतले जात आहे. शाहीर संभाजी भगत हे मुळचे सातारा जिल्ह्यातील पांचगणी जवळील महू गावचे. संभाजी भगत हे लहानपणापासूनच गावातल्या कुणबी व मातंग समाजातील कलावंतांची गायकी ऐकतच मोठे झाले. भजन व भारुडांवर संभाजी भगत यांचा कलावंत पिंड पोसला गेला. पुढे ते मुंबईत आले. डाव्या चळवळीशी जोडले गेले. शाहीर संभाजी भगत यांनी गावाकडचे कलासंचीत येथील नव्या फॉमर्मध्ये परावर्तित केले. संभाजी भगत यांनी अनेक पोवाडे गायले आहेत. राष्ट्रपती सुवर्णकमळ मिळालेल्या कोर्ट या चित्रपटातील एक गाणे त्यांनी गायले आहे. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ आगळ्यावेगळ्या अशा नाटकामुळे त्यांना नवी ओळख मिळाली. या नाटकाची मूळ संकल्पना नाटकातील गीते व संगीत संभाजी भगत यांची. आपल्या लोकांचे वास्तव ठोक शब्दात मांडत त्यातून विद्रोहाची ज्वाला फुलवण्यासाठी संभाजी भगत यांनी नवे व्यवहारातील शब्द शोधले मुंबईच्या धारावीत झालेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनात त्यांनी ‘हे पालखीचे भोई, आईची ओळख नाही’ हे गीत सादर केले. तेंव्हा सारे वातावरणच भारावलेल्या सारखे झाले. आव्हान नाट्यमंचातर्फे संभाजी भगत यांनी शाहीर विलास घोगरे यांच्याबरोबर अनेक पथनाट्य सादर केली. शाहीरी कार्यक्रम केले. कलेतून सतत समकालीन वास्तवाला भिडत राजकीय भूमिका घेणारा शाहीर म्हणून त्याचे लोककलेतील स्थान वादातीत आहे असे एडवोकेट सुभाष पाटील यांनी सांगितले. संभाजी भगत यांनी लिहिलेले लेखन साहित्य व इतर, अडगळ (नाटक), कातळाखालचे पाणी (आत्मचरित्र), तोड ही चाकोरी (गाण्यांचा संग्रह), रणहलगी (लेख संग्रह), उंदीर नावाचे भारुड आणि गिरणीचा वग हे मुक्तनाट्य. शाहीर संभाजी भगत हे नुकतेच 14 देशांमध्ये जाऊन आलेले आहेत. तेथील अनेक महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये त्यांनी पदव्युत्तर विद्यार्थी व प्राध्यापकांपुढे पर्यायी सांस्कृतिक राजकारणाची मांडणी केली आणि पर्यायी सांस्कृतिक राजकारण आपल्याला उभे केले पाहिजे असे तेथे ठासून सांगितले. अशा या लोककलेचा बाज असलेल्या विद्रोही साहित्यिक कलावंतांची विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेली निवड आनंदमय अशीच आहे, असे कॉम्रेड धनाजी गुरव म्हणाले. संभाजी भगत यांनी 5 व्या राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन आणि पहिल्या लोक सांस्कृतिक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलं आहे. सरपंच भगिरथ आणि नागरिक या चित्रपटाना संभाजी भगत यांनी संगीत दिले. तर, फनरल आणि तुझ्या आईला या चित्रपटात त्यांनी अभिनय केला आहे.संभाजी भगत यांना अस्मितादर्श पुरस्कार, मिफ्ता पुरस्कार, प्रबोधन मित्र पुरस्कार, संत तुकाराम पुरस्कार मिळालाय. विद्रोही सांस्कृतिक चळवळ,महाराष्ट्र आणि विद्रोही संमेलन संयोजन समिती, सातारा यांच्यावतीनं लवकरच १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर केली जाईल, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ सुहास महाराज फडतरे यांनी दिली. सातारामध्ये २२ वर्षानंतर विद्रोही साहित्य संमेलन सातारा येथे यापूर्वी ४ थे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन २००२ मध्ये झाले होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ.बाबा आढाव त्या साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष होते. आता २२ वर्षानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन आयोजित करण्यात आले आहे. विद्रोही साहित्य संमेलनांचा प्रवास पहिले विद्रोही मराठी साहित्य संमेलन धारावी (मुंबई) येथे पार पडल्यानंतर कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर (तत्कालीन औरंगाबाद) , सातारा, सावंतवाडी, पंढरपूर, धुळे, सोलापूर, इंदापूर, सांगली, राहुरी, बीड, शहादा, पुणे या ठिकाणी संमेलने झाली आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



