
रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल व्हिट्स आणिलगतच्या मोकळ्या जागेच्या वादग्रस्त लिलाव प्रक्रियेची आता विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी होणार आहे. या लिलावात मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने चौकशी समितीमध्ये बदल केला असून,आता विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती या प्रकरणाचा छडा लावणार आहे. 3 महिन्यांपूर्वी या प्रकरणाची चौकशी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सोपवण्यात आली होती. मात्र, आता त्यात बदल करूनही जबाबदारी थेट विभागीय आयुक्त पापळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. धनदा कॉर्पोरेशन कंपनीची देणी भागवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने 2018 मध्ये कंपनीच्या मालमत्ता लिलावाचे आदेश दिले होते. जिल्हा प्रशासनाने मे 2025 मध्ये लिलाव प्रक्रिया राबवली. यात पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या ‘सिद्धांत मटेरियल प्रोक्युअरमेंट’कंपनीने 64 कोटी 83 लाखांची बोली लावूनहा लिलाव जिंकला होता. शिंदेसेनेचे नेते संजय शिरसाट यांचे पुत्र यालिलाव प्रक्रियेत होते. महापालिका, जिल्हापरिषद निवडणुका महायुतीत असलेल्या या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांकडे देण्यामागे पालकमंत्र्यांच्या कोंडीचा प्रयत्न असल्याचे मानले जाते. 150 कोटी रुपयांची मालमत्ता अवघ्या 64 कोटी रुपयांत? या लिलावानंतर उबाठासह सर्वच विरोधीपक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला. या मालमत्तेचे बाजारमूल्य 150 कोटींच्या घरात असताना ती केवळ 64 कोटींत मोजक्याच लोकांना देण्यात आल्याचा आरोप झाला. विधिमंडळातही हा मुद्दा गाजला. विरोधपाहून मंत्र्यांच्या मुलाने लिलावातून माघार घेतली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आश्वासन दिले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



