
केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षणातून आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. ‘फ्युएल शिक्षण संस्था समूहा’तर्फे आयोजित ‘वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट-२०२६’ मध्ये ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या आधारे स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरी देणारे बनावे, असे त्यांनी नमूद केले. पुणे येथील फ्युएल कॅम्पसमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे, सीओओ मयुरी देशपांडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल आर्लेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या स्वप्नाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, वसाहतवादी विचारधारेला छेद देणारी नवीन शिक्षण नीती आणली गेली आहे. भारतीय शिक्षण आणि कौशल्य परिसंस्था मजबूत करण्यासाठी मूल्याधारित नेतृत्व आणि सहयोगी प्रशासन महत्त्वाचे आहे. राज्यपाल पुढे म्हणाले की, फ्युएलच्या प्रयत्नांमुळे देशभरातील वंचित आणि पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी आकांक्षा आणि रोजगारक्षमता यांच्यातील दरी कमी झाली आहे. फ्युएल शिक्षण संस्था आगामी काळात जागतिक दर्जाचे शिक्षण, कौशल्य आणि उद्योगांना एकत्रित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. यामुळे भारताच्या भविष्यासाठी सज्ज प्रतिभा परिसंस्था आणखी मजबूत होईल. समाजाने आपल्याला काय दिले यापेक्षा आपण समाजाला काय देऊ शकतो, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहनही त्यांनी केले. फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक डॉ. केतन देशपांडे यांनी सांगितले की, प्रतिभा सर्वत्र असते, परंतु योग्य संधी मिळत नाही. फ्युएलच्या गेल्या २० वर्षांच्या प्रवासात असे दिसून आले आहे की, जेव्हा कौशल्यपूर्ण शिक्षण आणि सन्मान रोजगाराशी जोडले जातात, तेव्हा वंचित तरुण भारताच्या विकासात आत्मविश्वासाने योगदान देऊ शकतात. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले की, नवीन शिक्षण धोरणात कौशल्य विकासातून उद्योगधंद्यांसाठी योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला जाईल. फ्युएल गेल्या दोन दशकांपासून शिक्षण आणि युवा विकासाच्या क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करत आहे. शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. उद्योजकांकडून सीएसआरच्या माध्यमातून ५ टक्के निधी घेऊन तो शिक्षणात परिवर्तित करून हुशार विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण विकासातून नोकरी किंवा उद्योगासाठी तयार केले जाते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



