
Ajit Pawar Death In Plane Crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानंतर वेगवेगळ्या शक्यता व्यक्त केल्या जात असतानाच आता शरद पवारांच्या पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. अजित पवारांच्या विमानामध्ये दोन स्फोट कसे झाले असा सवाल उपस्थित करत विमानात बॉम्ब होता का? अशी विचारणा केली आहे.
घातपात की अपघात?
अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ लॅडिंगदरम्यान झालेल्या भीषण विमान अपघातात निधन झालं. मात्र या अपघाताबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जात असतानाच हा अपघात की घातपात अशी शंका व्यक्त केली जात आहे. अजित पवारांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरींनी तर शंका उपस्थित करणारे अनेक प्रश्न कधी सोशल मीडियावरुन तर कधी थेट जाहीर कार्यक्रमांमध्ये उपस्थित केले आहेत. हा अपघातच असल्याचा दावा मिटकरींनी अनेकदा केला आहे. घातपात की अपघात अशी शंका उपस्थित होत असतानाच बीडमध्ये स्थानिक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक दावा केला आहे.
नक्की वाचा >> थोडक्यात बचावला मोठा नेता! अजित पवार म्हणालेले विमानाने ‘बरोबरच जाऊ’, पण..; स्वत: सांगितला घटनाक्रम
दोन स्फोट कसे झाले? विमानात बॉम्ब होता का?
“अजित पवारांच्या विमानाचे दोन व्हिडिओ समोर आले असून विमानाचा दोन वेळा स्फोट झाला. मग विमानामध्ये बॉम्ब होता का? बॉम्बने विमान उडवले गेले का? नेमकं काय घडलं आहे? याची चौकशी झाली पाहिजे. घात की अपघात याची देखील चौकशी झाली पाहिजे. सर्व सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आले पाहिजेत. ब्लॅक बॉक्स सार्वजनिक केला पाहिजे. सुरुवातीला सहा लोक डिक्लेअर केली मग एक कुठे गेला?” असे प्रश्न सोनावणेंनी उपस्थित केले आहेत.
हे सर्व सीसीटीव्ही कुठे आहेत?
“अजित दादा देवगिरी वरून किती वाजता निघाले त्याचा सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? एअरपोर्टवरून निघालेला सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे? फ्लाईटमध्ये ते कधी बसले त्याचा सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे?” अशी विचारणा बजरंग सोनावणेंनी केली आहे.
नक्की वाचा >> Ajit Pawar Plane Crash: विमान खाक, मृतदेहांचा कोळसा मात्र कागद का नाही जळाले? थक्क करणारं कारण समोर
अजित पवारांच्या अपघाताची थ्री लेअर इन्क्वायरी
अजित पवारांच्या विमानत अपघाताची तीन स्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यात विमानाचा वेग, विमानाची उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल, पायलटमधील संभाषणे अशा अनेक तांत्रिक माहितीचं संकलन केलं जाणार आहे. दुसऱ्या स्तरावर विमानाचे अवशेष प्रयोगशाळेत पाठवून त्याचे विश्लेषण केलं जाणार. यामधून विमान जमीनीवर आदळल्यानंतर बाहेरील बाजूस नेमका काय परिणाम झाला. विमानाला कधी आणि कशी आग लागली आणि विमानाच्या बॉडीसंदर्भातील बरीच माहिती मिळू शकणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यामध्ये अपघाताचा प्राथमिक अहवाल सादर केला जाणार, अंतिम अहवाल येण्यासाठी मोठा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच हा तपास आणि अहवाल प्रक्रिया दिर्घकाळ चालणार हे स्पष्टच आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



