
Rajya Sabha Maharashtra Members Tenure Ending List: महाराष्ट्रामध्ये पुढील दोन महिन्यांमध्ये राजकीय घडामोडींना अधिक वेग येईल असं चित्र पाहायला मिळत आहे. विशेष करुन केंद्रीय राजकारणामध्ये एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील सात खासदारांची मुदत संपत असल्याने या सात जागांवर कोण यासंदर्भातील चर्चा आताच रंगत आहे. 2 एप्रिल रोजी खासदारकीची मुदत संपणारे महाराष्ट्रातील 7 खासदार आहेत. मात्र 2020 च्या तुलनेत ही निवडणूक वेगळी ठरणार आहे. कारण 2020 ला निवडणूक झाली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार राज्यात असल्याने त्यांचे 4 उमेदवार राज्यसभेवर गेलेले. सध्या तशी स्थिती नाही. यंदा वारं महायुतीच्या बाजूने दिसत असल्याने कोण सातजण राज्यसभेवर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे या साऱ्या तडजोडीमध्ये शरद पवार काय निर्णय घेतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
सुनेत्रा पवारांची जागा रिक्त
ज्या खासदारांची उमेदवारी संपत आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन, शिवसेना एक, काँग्रेस एक तर सत्ताधारी भाजपच्या कोट्यातील तीन जागांचा समावेश आहे. विधानसभेतील सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीकडील एकंदर पक्षीय बलाबल पाहता राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीदरम्यानच सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अजित पवारांच्या निधानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सुनेत्रा पवारांनी आपल्या सोशल मिडिया बायोमध्ये एक्स मेंबर ऑफ पार्लामेंट असा उल्लेख केला आहे. त्यामुळे त्यांनी राज्यसभेची खासदारकी सोडल्याचं स्पष्ट होत आङे.
2020 ला निवड झालेल्यांपैकी एकाचे निधन, दुसरा लोकसभेवर निवडून गेला
राज्यसभेच्या सात जागांसाठी मार्च 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून महाविकास आघाडीचे 4 तर भाजपचे 3 खासदार बिनविरोध निवडून गेले होते. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, फौजिया खान, शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसकडून राजीव सातव, तर भाजपकडून भागवत कराड, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचा समावेश होता. दरम्यान कोरोनामुळे सातव यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना संधी देण्यात आली. उदयनराजे लोकसभेत निवडून गेले. त्यामुळे त्यांच्या जागी शेकापमधून भाजपात आलेल्या धैर्यशील पाटील यांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. या सर्व सदस्यांचा कार्यकाळ 2 एप्रिलला संपत आहे. यामुळे या निवडणुकीकडे सत्ताधारी तसेच विरोधकांचे लक्ष लागून राहिले असून पुढील काही दिवसांत उमेदवारांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.
असे असेल मतांचे गणित
विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता राज्यसभेसाठी एका उमेदवाराला 37.5 मतांची गरज आहे. यानुसार भाजपच्या 4, शिंदे गट 1, अजित पवार गट 1 आणि महाविकास आघाडीचा 1 उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून येईल.
महायुतीला 6, मविआला 1 जागा
राज्यसभेच्या सात जागांसाठी 2020 मध्ये निवडणूक झाली होती, तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्या काळात विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर मविआने चार जागा जिंकल्या होत्या. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली असून उपलब्ध संख्याबळ पाहता, महायुतीच्या वाट्याला 6 जागा येतील. आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे
लागणार आहे.
विधानसभेत असे आहे संख्याबळ
महायुती: भाजपचे 131, शिंदे गट 57, अजित पवार गट 40
मविआ: शिवसेना 20, काँग्रेस 16, राष्ट्रवादी काँग्रेस 10
इतर अपक्ष 7, सपा 2, एमआयएम 1, रिक्त जागा 2
शरद पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष
शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच, राज्यसभेची मुदत संपल्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असेही त्यांनी सूचित केले होते. त्यामुळे आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत पवार नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शरद पवारांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली तर त्यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्ती घेतल्यासारखेच होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
या खासदारांची मुदत संपणार
भाजप : डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील, रामदास आठवले (रिपाई)
राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवार, फौजिया खान
शिवसेना: प्रियांका चतुर्वेदी
काँग्रेस : रजनी पाटील
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



