
महानगरपालिका निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर आता भाजप पुण्यात आपला महापौर बसवण्यासाठी आक्रमक झाली असून, ही निवड बिनविरोध व्हावी यासाठी पक्षाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पुण्यात पार पडलेल्या भाजप नगरसेवकांच्या बैठकीनंतर गटनेते गणेश बिडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खोचक सल्ला दिला आहे. सुरेश कलमाडी आणि अजित पवार यांच्या जाण्याने शहरावर एक प्रकारे दुःखाचा प्रसंग ओढवला असल्याचे सांगत, या पक्षांनी त्यांना श्रद्धांजली म्हणून महापौर निवड बिनविरोध पार पाडण्यासाठी सहकार्य करावे आणि ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, असे मत बिडकर यांनी व्यक्त केले आहे. भाजपचे गटनेते गणेश बिडकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, शहराच्या राजकीय परंपरेनुसार ही निवडणूक प्रक्रिया लवकरात लवकर आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडणे अपेक्षित आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आवाहन करताना बिडकर म्हणाले की, सत्ता गेल्यामुळे त्यांच्यावर जो दुःखाचा प्रसंग ओढवला आहे, त्याला श्रद्धांजली म्हणून त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे. याबाबत इतर विरोधी पक्षांशी प्राथमिक चर्चा झाली असून, ते त्यांच्या वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. पुण्याच्या राजकीय संस्कृतीचा दाखला देत बिडकर यांनी स्पष्ट केले की, निवडीनंतर कोणताही गुलाल उधळला जाणार नाही किंवा ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला जाणार नाही. पुण्यात राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच असते, इतर प्रसंगी सर्व पक्ष एकत्र येतात ही आपली संस्कृती आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यानुसार, महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर केवळ एक ओळीचा अभिनंदनाचा ठराव मंजूर केला जाईल आणि कोणताही जाहीर सोहळा साजरा केला जाणार नाही. विरोधकांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देऊन निवडणूक प्रक्रिया शांततेत संपवावी, अशी विनंती भाजपकडून करण्यात आली आहे. दरम्यान, महानगरपालिकेतील प्रदीर्घ प्रशासकराज संपुष्टात आल्यानंतर तब्बल चार वर्षांनी उद्या, सोमवार दि. 9 फेब्रुवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसह महापालिका सभागृह पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींनी गजबजणार आहे. या ऐतिहासिक निवडीसाठी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले असून, महापौर व उपमहापौरांच्या निवडीनंतर आगामी काही दिवसांतच स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि विविध विषय समित्यांच्या सदस्यांची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. महापालिकेचे नवे सभागृह आणि पदाधिकारी अस्तित्वात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून नवीन लोकप्रतिनिधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली असून संपूर्ण महापालिका परिसरात सध्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



