
अनेक तरुण पोलिस भरतीसाठी वर्षानुवर्षे अथक परिश्रम घेत असतात. कधी एकदा भरती येते आणि त्यात आपण आपला केलेला सगळा सराव पणाला लावून पोलिस सैन्यात भरती होऊ, याची वाटच हे तरुण बघत असतात. मात्र, बीडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खाकी वर्दीचे स्वप्न घेऊन आलेल्या एका तरुणाची पोलिस भरतीदरम्यानच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडमध्ये सध्या पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. आज मैदानी शारीरिक चाचणी सुरू असताना, 1600 मीटर धावण्याच्या फेरीत दीपक भास्कर वावळ या तरुणाचा मृत्यू झाला आहे. धावत असताना अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर येऊन तो थेट मैदानावरच कोसळला. मैदानावर उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच वैद्यकीय पथकाने तातडीने दीपकला बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याची प्रकृती आणखी खालावली. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. मृत दीपक वावळ हा परळी तालुक्यातील रहिवासी होता. पोलिस भरतीसाठी तो बीडमध्ये आला होता. आपला मुलगा पोलिस बनूनच परत येईल, अशी आशा बाळगून असलेल्या वावळ कुटुंबावर या घटनेने दुःखाचे डोंगर कोसळले आहे. तसेच या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेत अमिषांना बळी न पाडण्याचे आवाहन पोलिस अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच या प्रक्रियेत कोणीही स्टेरॉईडचा वापर करू नये, केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. पोलिस भरती प्रक्रियेत, गोळा फेक, धावणे व इतर मैदानी चांचणींचा समावेश असतो.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



