
जळगाव जिल्ह्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका गौण खनिज चोरीच्या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या खडसे यांनी पोलिसांशी अत्यंत अर्वाच्य भाषेत अरेरावी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणणे आणि पोलिसांशी गैरवर्तन केल्याचा आरोप खडसे यांच्यावर करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्यावर कलम 296 नुसारे सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा पोलिस ठाण्यात एका गौण खनिज चोरीच्या प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसे यांनी अर्वाच्य शब्दांत अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. एकनाथ खडसे यांच्यावर करण्यात आलेल्या या आरोपांचे खडसे यांनी खंडन केले आहे. ते म्हणाले, गौण खनिज प्रकरणात चौकशीसाठी सावदा पोलिस स्टेशनमध्ये गेलो, मात्र त्यावेळी माझ्याकडून एक चुकीचा शब्द निघाल्याने पोलिस निरीक्षकाची माफी मागीतल्याची माहिती खडसे यांनी दिली आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांना मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला होता. भोसरी जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसे यांना दिलासा देण्यात आला असून आरोप निश्चितीच्या प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे खडसे कुटुंबाविरोधातील 13 तारखेला होणारी आरोप निश्चिती सध्या तरी टळली आहे. कायदेशीर प्रक्रियेला 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती पुण्यातील बहुचर्चित भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला असून, सत्र न्यायालयातील कायदेशीर प्रक्रियेला 24 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील 2018 च्या सुधारणेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याची दखल घेत न्यायमूर्ती अश्विन भोबे यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. तसेच, हे प्रकरण द्विसदस्यीय खंडपीठासमोर तातडीने ‘मेंशन’ करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. खडसेंवर यापूर्वी या कायद्याच्या कलम 13 (1 ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र कायद्यातील सुधारणेनंतर बदललेल्या कलमांमुळे उद्भवलेल्या कायदेशीर पेचामुळे तूर्तास ही स्थगिती देण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



