
Zee 24 Taas Operation Khairat: महाराष्ट्रात टीडीआरचे जादूचे प्रयोग झाले असून, या प्रयोगातून एका कंपनीचं उखळ पांढरं झालं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी यामध्ये आग्रह केला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या च-होली गावातील मलनिस्सारण प्रक्रिया केंद्राच्या जमिनीबाबत हे प्रकरण आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 304 दिवसांत 58 कोटींच्या जमिनीला 213 कोटींचा मोबदला मिळाला आहे. झी 24 तासने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपण हे प्रकरण लावून धरणार असल्याचं म्हटलं आहे. “मला दोन गोष्टी सर्वात जास्त खटकल्या. एक होती ती, हनुमंतराव गायकवाड यांनी जमीन विकली असेल आणि त्यानंतर सुद्धा त्यांनी पत्र लिहिणं हे मला प्रश्नार्थक वाटलं. निलेश कलाटे आणि हनुमंतराव गायकवाड यांच्यात काही भागीदारी होती का? कारण हनुमंतराव गायकवाड यांच्या कंपनीकडे सगळेच सरकारी कंत्राट आहेत. त्यामुळे त्यांना राजकारण्यांचं पाठबळ आहे हे खरं आहे. त्यांना कुठलंही कंत्राट मिळतं. जरांडेश्वर किंवा इतर गौडबंगालात सतत त्यांचं नाव ऐकत असते”, असं अंजली दमानिया यांनी सांगितलं आहे.
पुढे त्यांनी म्हटलं की, “मी सर्व माहिती काढून उद्या पुन्हा यावर बोलणार आहे. जर 2007-08 पासून हा विषय सुरु आहे तर मग असं काय घडलं की आता हा व्यवहार झाला आणि तो झाल्यावर लगेच पैसे दिले गेले. मग हे फक्त यांना दिले की आजुबाजूला शेतकरी होते, ते किती होते? कोण होते? हे जाणून घेणं गरजेचं आहे. पण प्रथमदर्शनी दोघांच्या फायद्यासाठी केलं गेलं काय असं प्रश्नचिन्ह येत आहे”. राजकीय रंग असण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “याचा अभ्यास आम्ही करु. भाजपाच्या या राज्यात मोठ्या प्रमाणात अशी प्रकरणं समोर येत आहेत. भ्रष्टाचाराने ग्रस्त झालेलं भाजपाचं महायुती सरकार आहे. त्यामुळे यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. निश्चित याची चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर आलं पाहिजे”.
सत्तेचा इतका अंहकार आला आहे की, विरोधी पक्षांना, माध्यमांना जुमानत नाहीत. आपलं काही होणार नाही, चौकशा होऊ शकत नाहीत, पांघरुन टाकून क्लीन चीट दिली जाते हे भाजपाचा प्रकार आपण पाहत आहोत. यासंदर्भातही अशाच प्रकारचं राजकारण होऊ नये आणि सत्य समोर आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



