
विशाल मोरे, झी मीडिया, नाशिक : अचानक होणारे स्फोट, घरांना जाणारे तडे आणि शेतीवर होणारे वाईट परिणाम यामुळं सध्या नाशिकच्या मालेगाव इथं नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या स्फोटांमुळं सध्या नागरिकांमध्येसुद्धा प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
मालेगावात घडतंय काय?
मालेगाव तालुक्यातील हाताने येथे जवळपास 7 खडी क्रशरचे प्लांट असून त्यामुळे तेथील नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. रात्री अपरात्री या खडी स्टोन प्लांट मध्ये ब्लास्टिंग होत असून, शिवाय या प्लांटमुळं गावाचा 30 ते 35 लाख रुपयांचा महसूल बुडवला आहे. यासाठी ग्रामपंचायतीनं वारंवार प्रकल्पाला नोटिस बजावूनसुद्धा त्यामुळे गावच्या विकासासाठी महसूलाची व्यवस्था झालेली नाही. शिवाय गावात प्रादुर्भाव पण वाढल्याने हे सर्व खडी क्रशर प्लांट बंद करण्याचा ठरावही गावानं केला. मात्र कंपनीकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
खडी तयार करण्यासाठी केले जातात स्फोट…
खडी तयार करण्यासाठी या प्लांट मध्ये दिवसा, रात्री अपरात्री मोठी ब्लास्टिंग केली जाते अर्थात स्फोट घडवून आणले जातात. यामुळे लहान मुलं, जनावरंही सतत दचकत असून या स्फोटांमुळं आणि ब्लास्टिंग मुळे गावातील घरांना तडे गेले आहेत. या खडीची वाहतूक मोठमोठ्या डंपरमधून केली जाते, या डंपरना कोणत्याही प्रकारचे कपड्याचे आवरण नसल्याने लहान शालेय विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांनासुद्धा ये-जा करण्यासाठी मोठा धोका असून अपघाताची शक्यता असल्यानं भीतीचं वातावरण आहे.
शेतीवरही होतोय अनिष्ठ परिणाम, काय घडतंय?
या गावात असणाऱ्या खडी क्रशरच्या प्लांटमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे पीक धोक्यात आले आहे. प्लांटला कुठेही नेट अर्थात जाळीसुद्धा मारली नसल्या कारणाने प्लांट मधील सर्व धूळ पिकावर आल्यानं मका, कांदा, शेवगा आदी पीक घेणं शेतकऱ्यांना आव्हानात्मक होत असून असून काही शेतकऱ्यांना यामुळे श्वसनाचे, डोळ्यांचे आजारांचाही सामना करावा लागत आहे.
एकंदरीत स्थिती पाहचा, प्रथमदर्शनी गावच्या विकासासाठी हा प्लांट गावात आला होता. मात्र लाखोंचा महसूल बुडवल्याने गावाचा विकास देखील साधता येत नाही याउलट प्लांटमुळे गावात होणारा प्रादुर्भाव यामुळे ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांचं जीवनमान खालावलं आहे, ज्यामुळं तेव्हा हे प्लांट तात्काळ बंद करण्याचा ठराव गावकऱ्यांनी केला आहे. मात्र आता प्रशासनाकडून गावाच्या हिताचा विचार करत प्रकल्पावर कठोर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



