
Sanjay Raut On Local Body Elections: “महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदांवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. शिवसेनेसह विरोधी पक्षांची पीछेहाट झाली व लातूरवगळता एकही जिल्हा परिषद विरोधी पक्षांना जिंकता आली नाही. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया योग्य आहे. ते म्हणतात, “विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती दिसत नाही.” इच्छाशक्तीचा अभाव हे विरोधी पक्षांच्या पराभवाचे मुख्य कारण आहे, असे फडणवीस म्हणत असले तरी ते संपूर्ण खरे नाही. मुळात विरोधी पक्षाने निवडणुका लढूच नयेत अशी परिस्थिती भाजपने निर्माण केली आहे. निवडणुकीत विरोधकांचे उमेदवार पळवायचे किंवा निवडून आल्यावर त्या लोकप्रतिनिधींना पैशाच्या जोरावर विकत घ्यायचे. त्यामुळे विरोधी पक्षाची पीछेहाट होत आहे व निवडणुका आता लढवायच्या कशाला? या मानसिकतेत सगळेच आले,” असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तमाशात काम करणाऱ्या एका साध्या कलावंत स्त्रीने…
“जिल्हा परिषद निकालानंतर एका ज्येष्ठ नेत्याशी चर्चा झाली. ते म्हणाले, “भाजप आता 2029 च्या तयारीला लागलाय व त्या निवडणुकीचे बजेट आता तरी 25,000 कोटी इतके ठरलेय. ते वाढेलही. या खेळात फडणवीस विरोधकांच्या इच्छाशक्तीची परीक्षाच घेत आहेत. भाजप राज्यात व देशात सत्तेवर आहे. तरीही लोकसभेपासून ग्रामपंचायतींपर्यंत सर्व निवडणुका त्यांना जिंकायच्या आहेत. जे राजकारणात आहेत व राजकारण हे सत्ता मिळवण्यासाठीच करायचे हे ज्यांना मान्य आहे, त्यांना निवडणूक युद्धासारखी लढावी लागेल. जिल्हा परिषद निवडणुकांत भाजप 225 जागा जिंकतो, राष्ट्रवादी 165 आणि शिंदे गट 162 जागा जिंकून आघाडी घेतो. हे फक्त सत्ता आणि पैशांनी घडते असे नाही. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या बहुतेक सर्वच माजी नगरसेवकांचा पराभव जनतेने केला. हे नगरसेवक पुन्हा निवडून यावेत यासाठी शिंदे गटाने धरण फुटावे असा पैसा खर्च केला. तरीही यश आले नाही. जिल्हा परिषद निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरातील शिवसेनेचे एक जिल्हाप्रमुख राजू राठोड यांनी पक्षांतर केले व ते शिंदे गटात गेले. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांचा गोंदेगाव गट राखीव राहिल्याने या गटातून त्यांचा पत्ता आधीच कट झाला. त्यांनी शेजारील आमखेडा गटातून मुलीला उभे केले. मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी श्री. अंबादास दानवे यांचा फोन आला. ते म्हणाले की, “राजू राठोड यांचे हनुमंतखेडा हे गाव असलेल्या गोंदेगाव गटातून आपल्या शिवसेनेच्या उमेदवार सुनीता चव्हाण निवडून आल्या आहेत. इतकेच नाही तर राजू राठोडच्या मुलीचा आमखेडा गटातून दारुण पराभव झाला आहे.” गोंदेगाव गटातून विजयी झालेल्या उमेदवाराची मी चौकशी केली. दानवे म्हणाले, “तमाशात काम करणाऱ्या एका साध्या कलावंत स्त्रीने शिंदे गटाच्या धनाढ्य उमेदवाराचा पराभव केला.” असं राऊत यांनी ‘रोखठोक’ या सदरातील आपल्या लेखात म्हटलं आहे.
…तर राजकारणात पैसा पाचोळ्यासारखा उडून जातो!
“संभाजीनगरच्या गोंदेगाव व आमखेडा या दोन्ही गटांतून धनशक्तीच्या बळावर आपले उमेदवार निवडून येतील, अशी राठोड यांना खात्री होती. मात्र मतदारांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. शिवसेनेने राठोड यांच्या गावातील सौ. सुनीता चंद्रशेखर चव्हाण यांना उमेदवारी दिली. त्यांची घरची परिस्थिती बेताची. पती चंद्रकांत हे शासकीय रुग्णवाहिकांवर कंत्राटी पद्धतीने `पार्ट टाइम’ नोकरी करतात. पत्नी घरकाम व मोलमजुरी करते. चंद्रशेखर चव्हाण यांचा लोककला सादरीकरणाचा लहानसा फड आहे. त्यात सुनीता चव्हाणही काम करतात. लग्न समारंभ, अंत्यसंस्काराच्या यात्रेत गाणी व भजने म्हणण्याचे काम हे दाम्पत्य करते, पण सुनीता चव्हाण यांनी राजू राठोड यांनी दिलेल्या शिंदे गटाच्या उमेदवार पूजा वाघ यांचा दारुण पराभव केला. तात्पर्य असे की, फक्त पैशांवरच निवडणुका जिंकायला हव्यात असे नाही. राठोड यांच्यासारखी अनेक उदाहरणे आहेत. परभणीतल्या `श्रीमंत’ वरपुडकर घराण्यातील पाच जणांचा जनतेने पराभव केला. लढण्याची जिद्द व प्रेरणादायी नेतृत्व असेल तर राजकारणात पैसा पाचोळ्यासारखा उडून जातो,” असंही राऊतांनी म्हटलं आहे.
…तरीही एखाद्या फाटक्या उमेदवाराचा विजय होतो!
“निष्ठा आणि विचार आज कोठेच शिल्लक राहिलेला नाही. `बचेंगे तो और भी लढेंगे’ असे पानिपतच्या मैदानावर दत्ताजी शिंदे म्हणाले होते. आता `लढेंगे’ संपले व सगळेच `बचेंगे’च्या मार्गाने निघाले. सगळ्यांनाच आपल्या इस्टेटी व चामडी वाचवायची आहे. एका अज्ञात बेटावर नेपोलियनचा मृत्यू झाला. त्याची कबर ब्रिटिश सैन्याने घेरली होती. नेपोलियनचे डॉक्टर व इतर सरदार फ्रान्सला परत गेले, पण काही एकनिष्ठ सैनिक व सेवक आपल्या राजाच्या प्रेमापोटी तिथेच थांबले. त्यातले काही सेवक इतके कडवट होते की, नेपोलियनचे अवशेष त्यांनी 18 वर्षांनी फ्रान्समध्ये आणले. तोपर्यंत ते त्या कबरीची सेवा करीत राहिले. त्यातील काहींचा तेथेच मृत्यू झाला, तर उरलेले सैनिक नेपोलियनचे अवशेष फ्रान्समध्ये आणल्यावर परतले. हे यासाठी सांगायचे की, आताच्या राजकारणात दत्ताजी शिंदे, नेपोलियन राहिलेले नाहीत व तसे निष्ठावान सैन्य उरले नाही. सैन्य पोटावर चालते, पण आता निवडणुकीतील सैन्य फक्त पैशांच्या बंडलांवर चालते. तरीही एखाद्या फाटक्या उमेदवाराचा विजय होत असतो हे अनेक ठिकाणी दिसले,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



