
Harshwardhan Sapkal Controversial Comment: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना टिपू सुलतानशी केल्याने भारतीय जनता पार्टीसहीत अनेक संघटना आक्रमक झाल्याचं आज सकाळपासून पाहायला मिळत आहे. सपकाळ यांच्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर पडसाद उमटत आहेत. पुण्याबरोबच सांगली, छत्रपती संभाजीनगरसहीत अनेक शहरांमध्ये सपकाळ यांच्याविरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसचे आंदोलक आमन-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं. पुण्यामध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने वातावरण चांगलेच तापले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी गुन्हा दाखल केला आहे. पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
राजीनामा घ्या
सांगलीत भाजपच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सांगलीतील काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करत हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून भाजपाकडून निषेध नोंदवण्यात आला. सपकाळ यांच्या विधानाविरोधात भाजपाकडून सांगलीत आंदोलन करत काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून बडतर्फ करावं, अशी मागणी सांगली भाजपाकडून करण्यात आली आहे. सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सांगली भाजपा शहराध्यक्ष प्रकाश ढंग यांनी भाजपच्यावतीने केली आहे. भाजपाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पुण्यात गाड्यांच्या काचा फुटल्या…
पुण्यात भाजपाने काँग्रेस भवनासमोर आंदोलन करताना काँग्रेस भवनात शिरण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना आडवलं. भाजप हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात काँग्रेस भवन समोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस कार्यकर्ते ही भाजपला उत्तर देण्यासाठी काँग्रेस भवनाच्या आवारात एपस्टिन फाईलमधील नावं जाहीर करा अशी मागणी करत घोषणाबाजी केली. भाजप आंदोलनाला उत्तर देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी मध्यस्थी करुन परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या ठिकाणी काही गाड्यांवर दगडफेक आणि बाटल्या फेकण्यात आल्याने गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं.
नागपुरमध्ये मोठं आंदोलन अन् घोषणाबाजी
भाजप युवा मोर्चाने नागपुरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं. महाल परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात आलं. हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात भाजपाकडून जोरदार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागपुरात भाजपा युवा मोर्चाने हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आंदोलन करत याप्रकरणी सपकाळांनी माफी मागण्याची मागणी ही केली. आंदोलनात भाजपा युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केलीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक महाल येथे या आंदोलनस्थळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
शहरात पाऊल ठेवू देणार नाही
सपकाळ यांच्याविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्येही भाजपा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात सपकाळांविरोधात भाजपाकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. महिलांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला चप्पल, बूट मारत निषेध केला. हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत भाजपाने निदर्शने केली. सपकाळ यांनी माफी मागावी अन्यथा शहरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा मंत्री अतुल सावे आणि आमदार संजय केनेकर यांनी केला आहे.
त्या व्यक्तीला देणार एक लाख रुपये
दुसरीकडे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी सपकाळ यांनी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दांमध्ये निशेष केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळं फासणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस देणार असं मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी घोषणा करताना म्हटलं आहे. “छत्रपतींच्या नखाची ही सर टिपू सुलतानला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या तोंडाला काळ फासलं जाईल. तसेच त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.
वैचारिक दिवाळखोरी
भाजपाचे आमदार निरंजन डावखरेंनी हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याने आपल्याला काँग्रेसची मानसिकता आणि वृत्ती हे निश्चितपणे समोर दिसून येते. मतांचं लांगुलचालन चालू करत असताना आपण कोणत्या टप्प्यावर जायला पाहिजे? आपण कुठला खालचा तळ काढला पाहिजे हे ज्याचे त्याला समजलं पाहिजे. त्यामुळे अशा वैफल्यग्रस्त लोकांकडून किंवा ज्यांच्याकडे विचारांची शिकवण नाही अशा लोकांकडून काय वक्तव्य अपेक्षित करणार? महाराजांची तुलना ही टिपू सुलतानबरोबर करणे ही त्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे,” अशी टीका भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार असलेल्या डावखरेंनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



