
Uddhav Thackeray Shivsena Slams Harshwardhan Sapkal: महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या टिपू सुलतान प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेनं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली तुलना अयोग्य असल्याचं म्हणत कानपिचक्या दिल्या आहेत. भारतीय जनता पार्टीकडून मागील दोन दिवसांपासून टिपू सुलतान प्रकरणावरुन रान उठवण्यात आलेलं असतानाच ‘सामना’च्या अग्रलेखातून टिपू सुलनात आणि छत्रपती शिवाजी महाराजांमधील फरक सांगत हर्षवर्धन यांना एकप्रकारे लक्ष्य करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज कसे वेगळे होते आणि छत्रपती शिवाजी महाराजच अनेक बाबतींमध्ये कशाप्रकारे श्रेष्ठ असून हर्षवर्धन यांनी केलेली तुलना चुकीची असल्याचं या अग्रलेखात म्हटलं आहे. या अग्रलेखात छत्रपती आणि टिपू सुलतानमधील फरक समजवून सांगताना मांडलेले मुद्दे कोणते ते पाहूयात…
1 > “औरंगजेब, अफझलखानाप्रमाणे म्हैसूरचा टिपू सुलतान पुन्हा कबरीतून बाहेर आला आहे. मालेगाव महानगरपालिकेत उपमहापौर ‘शान-ए-हिंद’ यांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याने वाद वाढला, पण वाद चिघळण्याआधीच टिपूची तसबीर भिंतीवरून हटवण्यात आली. मात्र त्या सर्व प्रकरणाचे नेहमीचेच राजकारण, हिंदू-मुसलमान असा रंग भारतीय जनता पक्षाने चढवला. त्या रंगात भेसळ केली ती काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी. सपकाळ यांचे म्हणणे असे की, टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले पाहिजे. टिपूचे काम व छत्रपतींचे कार्य समकक्ष असल्याचे बोलून सपकाळांनी भाजपच्या हाती कोलीत दिले. मुळात ही अशी तुलनाच होऊ शकत नाही. यावर देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षाने काँग्रेसला धारेवर धरले. काँगेसची नैतिकता, लाज, लायकी काढली.
2 > छत्रपतींना टिपूच्या बरोबरीने उभे करणे हे निंदनीय आहेच. टिपूसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करायचे काम सपकाळ यांनी केले व ते निंदनीय असल्याचे मत मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. टिपू सुलतानचे नाव घेतल्यावर भाजपवाल्यांना सोयीनुसार शिसारी येते हे खरे, पण याच टिपू सुलतानला पाकिस्तानात ‘नायक’ म्हणून गौरविले जाते. त्या पाकिस्तानबरोबर भारत क्रिकेट सामने खेळत आहे हे फडणवीस व भाजपला निंदनीय वाटू नये याचे आश्चर्य वाटते.
3 > टिपू सुलतान कोण, काय? हा इतिहास चिवडत बसण्यात अर्थ नाही. तो म्हैसूरचा राजा होता. त्याचा बाप हैदरअलीही राजा होता. त्याने ब्रिटिशांबरोबर लढाया केल्या. तो योद्धा होता, पण स्वतःचे राज्य, साम्राज्य वाचवण्यासाठी तो ‘युद्ध’ करीत होता. छत्रपती शिवाजीराजांचे तसे नव्हते. छत्रपतींनी मोगलांचे आक्रमण रोखण्यासाठी हिंदवी स्वराज्य शून्यातून उभे केले. त्यांनी स्वतःचे राज्य निर्माण केले. टिपूला राज्य वारशाने लाभले.
4 > छत्रपतींनी स्वराज्याच्या शत्रूंना याच मातीत गाडले. औरंगजेब, अफझलखान असे मोगल राजे व सरदार हिंदवी स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी महाराष्ट्रावर चाल करून आले तेव्हा छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य रक्षणासाठी तलवार उपसली हा इतिहास आहे. छत्रपती मोगलांविरुद्ध लढले. टिपू सुलतान इंग्रजांविरुद्ध लढला. 4 मे 1799 रोजी टिपू सुलतान श्रीरंगपट्टणमच्या ब्रिटिशांबरोबरच्या लढाईत मारला गेला. टिपू सुलतानने इंग्रजांना रोखण्यासाठी बलिदान केले असे काही इतिहासकारांचे आणि भाजपचेही ठाम मत आहे. त्यामुळे टिपू हा इंग्रजांबरोबरच्या लढाईतला पहिला स्वातंत्र्य सैनिक होता, असे इतिहासकार सांगतात. मात्र टिपूने हिंदूंच्या बाबतीत जबरदस्तीची धर्मांतरे घडवून आणली, मंदिरे पाडली, हिंदूंचा छळ केला, असेदेखील सांगितले जाते. त्यामुळे टिपूच्या मानपानावरून ‘हिंदू विरुद्ध मुसलमान’ असे झगडे नेहमीच झाले. ते या ना त्या कारणाने उफाळून येतात.
5 > एक गोष्ट मान्य केली पाहिजे ती म्हणजे ब्रिटिशांचा ‘युनियन जॅक’ शनिवारवाड्यावर फडकवण्याची घाई पेशवाईतल्या बाळाजीपंत नातू वगैरे लोकांना झाली होती. त्या वेळी ब्रिटिश राजवटीचा प्रतिकार करणारा पहिला भारतीय राजा टिपू सुलतान होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे आपल्या राज्यावर आलेले संकट आहे ही त्याची धारणा होती. त्याने ब्रिटिशांच्या नाकात दम आणला व ब्रिटिश सैन्याला अनेकदा टिपूपुढे माघार घ्यावी लागली.
6 > टिपूच्या बापाने ‘रॉकेट’ वापराची सुरुवात केली. दारूगोळ्यांचा वापर शत्रू सैन्याविरुद्ध म्हणजे इंग्रजांविरुद्ध करण्यास त्याने सुरुवात केली. लष्करात त्याने आधुनिकता आणली हे खरेच. दक्षिणेतील सर्व लहान राज्ये त्याने जिंकली व स्वतःचे राज्य वाढवले, पण तरीही छत्रपती शिवरायांचे हिंदवी स्वराज्य हे जगात उठावदार ठरले. हिंदवी स्वराज्य आकाशातून पडले नाही. ते शिवरायांनी तलवारीच्या बळावर निर्माण केले. महाराज हे गोब्राह्मणप्रतिपालक होते. ते लेकीसुनांचे संरक्षक होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेस त्यांनी खणानारळाने ओटी भरून पाठवले. टिपूवर गायत्रीवरील बलात्काराचा डाग लागला. तो कधीच पुसला गेला नाही.
7 > टिपू सुलतान हा भारतातला असला तरी त्याच्या शौर्यामुळे पाकिस्तानात त्याला एक ‘नायक’ म्हणून ओळखले जाते. पाकिस्तानमध्ये तो एक पूजनीय योद्धा आहे. त्यामुळे टिपूला भारतीय मुसलमानांनी ‘नायक’ मानणे हे सर्वस्वी चूक आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



