
Thane Navi Mumbai Politics: राज्याचे वनमंत्री गणेश नाईक आणि खासदार श्रीकांत शिंदेंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आहे. श्रीकांत शिंदेंचे वडील राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांमधील वाद सर्वश्रूत असतानाच आता श्रीकांत शिंदेंनी गणेश नाईकांना थेट आगामी लोकसभा माझ्या मतदारसंघातून लढून दाखवा असं आव्हान दिलं आहे. यानंतर गणेश नाईकांनी श्रीकांत शिंदेंना कायमचा माजी खासदार करेन अशा शब्दांमध्ये इशारा दिला आहे. हा वाद सुरु असतानाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून गणेश नाईकांना एक खास ऑफर देण्यात आली आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी चर्चा करताना ही ऑफर दिली आहे.
श्रीकांत शिंदे काय म्हणाले?
रविारी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी गणेश नाईक यांना लोकसभा निवडणुकीत थेट लढण्याचे खुले आव्हान दिले आहे. नाईक यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या आरोपांना “बिनबुडाचे आणि वारंवार केले जाणारे” आरोप म्हणत श्रीकांत शिंदेंनी टोला लगावला. तसेच, “नाईक यांना वयामुळे स्मृतीभ्रंश (डिमेंशिया)” झाल्याचा टोलाही श्रीकांत शिंदेंनी लगावला. “वयामुळे त्यांची स्मृती गेली आहे, म्हणून ते निराधार विधाने करत आहेत,” असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
गणेश नाईकांचं जशास तसं उत्तर
या आव्हानाला उत्तर देताना गणेश नाईक यांनी श्रीकांत शिंदेंना पराभूत करण्याची शपथ घेतली आहे. तुला कायमचा माजी खासदार करणार असं नाईक यांनी श्रीकांत शिंदेंना आव्हान देताना म्हटलं आहे. हा वाद ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांच्या मतदानावर मोठा परिणाम करू शकतो. कल्याण-डोंबिवली पट्ट्यामध्ये शिंदे यांचे वर्चस्व आहे, तर नवी मुंबई हा नाईकांचा गड समजला जातो. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांनी आपआपले गड राखल्याचं दिसून आलं. मात्र हा संघर्ष अधिक चिघळत जाण्याची शक्यता असल्यानेच संजय राऊतांनी गणेश नाईकांना घरवापसीची ऑफर दिली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून नाईकांना ऑफर
पत्रकारांशी चर्चा करताना गणेश नाईक आणि श्रीकांत शिंदे वादासंदर्भात विचारलं असता राऊतांनी, “भाजपसोबत राहून तुम्हाला या प्रवृत्ती सोबत लढता येणार नाही. हा माझा प्रेमाचा सल्ला आहे. गणेश नाईक यांनी पुन्हा स्वगृही यावं. त्यांनी आमच्याकडे येऊन हे रणशिंग फुंकावे. गणेश नाईक यांना भाजपात राहून लढाई लढता येणार नाही. पुन्हा मूळ प्रवाहात येऊन गणेश नाईक यांनी लढाई लढावी,” असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचं निमंत्रण दिलं आहे.
गणेश नाईकांनी शिवसेनेतूनच केली राजकारणाला सुरुवात…
1990 मध्ये गणेश नाईक सर्वात पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकिटावर बेलापूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. ही त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होती. 1994 मध्ये ठाणे मतदारसंघातून विक्रमी 1,09,001 मतांच्या फरकाने विजयी. 1995 मध्ये शिवसेना-भाजप सरकारमध्ये पर्यावरण मंत्री झाले आणि 1999 पर्यंत ते या पदावर होते. त्यामुळेच राऊतांनी त्यांना मूळ घरी म्हणजेच शिवसेनेत परत येण्याची ऑफर दिली आहे.
राष्ट्रवादी ते भाजपा प्रवास
1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन केल्यानंतर गणेश नाईक पवारांसोबत गेले. 1999 आणि 2004 मध्ये ठाण्यातून, तर 2009 आणि 2014 मध्ये ते ऐरोली मतदारसंघातून आमदार झाले. या काळात ते उत्पादन शुल्क मंत्री, पर्यावरण मंत्री (2004-2009), कामगार मंत्री (2005-2009) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री (2009 ते 2014) होते. 2009-2014 या काळात नाईक कुटुंब म्हणजे ती दिशा अशी ठाणे आणि नवी मुंबईची स्थिती होती. त्यांचा मुलगा संजीव नाईक ठाण्याचे खासदार होते, दुसरा मुलगा संदीप नाईक आमदार आणि पुतण्या सागर नाईक नवी मुंबईचे महापौर होते. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शरद पवारांची साथ सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत संदीप नाईक आणि नवी मुंबई महापालिकेतील 50 हून अधिक नगरसेवक भाजपामध्ये गेले. 2019 आणि 2024 मध्ये गणेश नाईक ऐरोलीतून आमदार म्हणून निवडून आले. सध्या ते उत्पादन शुल्क आणि अक्षय ऊर्जा मंत्री आणि वनमंत्री आहेत. त्यांचे अनेकदा शिंदेंसोबत खटके उडत असतात. महापालिका निवडणुकीच्या वेळेसही हे दिसून आलं.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



