
विशाल मोरे, झी मीडिया, मालेगाव : संपूर्ण महाराष्ट्रात टिपू सुलतान छायाचित्रावरुन वरून जो वाद सुरू आहे तो वाद मालेगावातूनच सुरू झाला असून आता पुन्हा त्या वादाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे. मालेगावच्या किल्ला परिसरात रविवरी रात्री उपमहापौर शान ए हिंद यांची स्वागत सभा आयोजित करण्यात आली होती, त्यात त्यांनी महापौर कार्यालयाचे दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यावर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा कार्यालयात लावणार असे विधान करत टिपू सुलतान यांचे कौतुक देखील केले.
आपले मनसुबे बोलून दाखवले आणि…
व्यासपीठावर भाषणात शान ए हिंद यांनी आपले मनसुबे बोलून दाखवले आणि त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली. ‘या बाईची बालिश बुद्धी दिसते आहे. संविधानाने, कायद्याच्या चौकटीत राहून जनाधार मिळवून आपण निवडून आलो आहोत. विकास करण्यासाठी त्यांना निवडून दिले आहे ते जर सामाजिक तेढ निर्माण करत असतील, तर भारतीय जनता पक्षाकडून मालेगावात जन आंदोलन उभं करण्यात येईल. हा केवळ हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर फोटो लावला तर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल’ असा इशारा देखील भाजप जिल्हा अध्यक्ष निलेश कचवे यांनी दिला.
हिंदूंच्या भावना दुखावण्याचा काम जर या उपमहापौर करत असतील तर…
दरम्यान, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केलेला फोटो लावण्यासाठी आम्हाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागते. कारण मुस्लिम धर्माच्या लोकांच्या भावना दुखावल्या जातात. परंतु हजारो हिंदूंची कत्तल करणारा हा टिपू सुलतान याचा फोटो शासकीय दालनात लावण्याचे काम आणि हिंदूंच्या भावना दुखावण्याचा काम जर या उपमहापौर करत असतील तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी आम्ही पण शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे धारकरी आहोत भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाने यांचा अफजलखान केल्याशिवाय राहणार नाही आणि यांना शहरात फिरू देणार नाही असा इशारा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे तालुका अध्यक्ष राहुल माऊली बच्छाव यांनी दिला.
सदर प्रकरणात याप्रकरणी शिष्टाचारानुसार कोणत्या महापुरुषांचे फोटो लावावेत याबाबत मनपा प्रशासनाकडून सगळ्यांना एक पत्र देण्यात आलं असून कायद्यानं हे बंधनकारक असून त्यांनी जर कायदा पाळला नाही तर त्यांच्यावर कायद्याप्रमाणे कारवाई होईल असं सांगण्यात येतं.
जेव्हा या सर्वांचे महापुरुष कॉमन होतील…
‘या देशात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन प्रश्न तेव्हा संपतील जेव्हा या सर्वांचे महापुरुष कॉमन होतील. त्यांची मातृभूमी कॉमन असेल. जे राष्ट्रगीताला सन्मान देतील. टिपू सुलतान हा आमचा आदर्श असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन कवीने “काशी जाती. गया जाती.. मथुरा मस्जिद होती .. अगर एक शिवा न होता तो सबकी सुन्नत होती.” असं केल्यानं आपण जे आहोत त्यांच्यामुळे आहोत त्यांचा अनादर कशासाठी? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
एकंदरीत पुन्हा जर टिपू सुलतान यांचा फोटो उपमहापौर यांनी त्यांच्या सरकारी मनपा कार्यालयात लावला तर निश्चित याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत अशीच स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. या प्रकरणावर आता काय कारवाई होते की पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात पडदा पडतो हे बघणं महत्वाचं ठरेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



