
महाराष्ट्रात सध्या नवा वाद सुरू झाला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करत वादग्रस्त विधान केले होते. टिपू सुलतानला छत्रपती शिवरायांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे असे त्यांनी म्हटले होते. यावरून भाजपने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्यात आता वडिलांवर होणारी टीका सहन न झाल्याने सपकाळ यांची मुलगी गार्गी सपकाळ आता मैदानात या मैदानात उतरल्या आहेत. माझ्या वडिलांचे मूळ वक्तव्य अतिशय स्पष्ट आणि संदर्भासह होतं. “शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी कार्य केलं. महाराजांप्रमाणेच त्यांनी कुठल्याही विखारी, विषारी विचारांना थारा दिला नाही, हा त्या वक्तव्याचा आशय होता, असे गार्गी यांनी म्हटले. गार्गी सपकाळ म्हणाल्या, माझ्या वडिलांच्या, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावरुन सध्या राज्यात जाणीवपूर्वक गदारोळ उभा केला जात आहे. हा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी नाही, तर त्यांच्या नावाचा राजकीय गैरवापर करून विरोधकांना बदनाम करण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न आहे. ज्यांनी सातत्याने महाराजांच्या विचारांना आणि इतिहासाला विकृत करण्याचं काम केलं आहे, तेच आज अचानक अपमान झाल्याचं ढोंग करत आहेत, हीच या संपूर्ण गदारोळामागची खरी राजकीय चाल असल्याचा आरोप गार्गी यांनी केला आहे. वक्तव्याचा हेतुपुरस्सर विपर्यास गार्गी सपकाळ म्हणाले, विविध जाती आणि धर्मांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तेढीच्या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी अशी मागणी केली होती की सर्व शासकीय कार्यालयांमध्ये महामानवांचे फोटो लावावेत, ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत टिपू सुलतान यांचेही फोटो असावेत. ‘या मागणीकडे आपण कसं पाहता?’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाच्या उत्तरात, वरील संदर्भात हे वक्तव्य करण्यात आलं. पण आज त्याच वक्तव्याचा हेतुपुरस्सर विपर्यास केला जात आहे. अपमान त्यांच्या विचारसरणीतून होतो तेव्हा तो चालतो पुढे गार्गी सपकाळ म्हणाल्या, यांच्याच लाडक्या भगतसिंग कोश्यारी यांनी ‘शिवाजी महाराज आता जुने झाले, नवे आयडॉल नितीन गडकरी’ अशी अपमानास्पद तुलना केली, फुले दाम्पत्याचा अपमान केला, तेव्हा या सत्ताधाऱ्यांच्या तोंडातून एक शब्दही निघाला नाही. उलट अशा व्यक्तीला महाराष्ट्रभूषण देऊन त्यांनी महाराजांप्रती आपली खरी मानसिकता उघडी पाडली. कोरटकर या मा. फडणवीसांच्या जवळच्या व्यक्तीकडून महाराजांचा अपमान होतो, तेव्हा हे गप्प बसतात. ‘मोदी म्हणजे शिवाजी महाराज’ अशी इतिहासाची विकृती करणाऱ्या महंतांना प्रश्न विचारत नाहीत. राजमाता जिजाऊसाहेबांबद्दल वादग्रस्त आणि अवमानकारक लिखाण करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना कधी जाब विचारला गेला नाही. म्हणजे जेव्हा अपमान त्यांच्या विचारसरणीतून होतो तेव्हा तो चालतो, हीच या सत्ताधाऱ्यांची दुटप्पी, दडपशाही आणि निवडक नैतिकतेची राजकारणाची परंपरा असल्याची टीका गार्गी यांनी केली आहे. स्वार्थी राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करतात गार्गी सपकाळ म्हणाल्या, माझे वडील छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारे आणि त्यांच्या समता, न्याय व लोककल्याणाच्या आदर्शांवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पण ज्यांना महाराजांचा हा समतेचा आणि न्यायाचा विचार मान्य नाही, ज्यांना फक्त प्रतीकांचा दिखावा प्रिय आहे, तेच लोक समाजात द्वेष पसरवतात. दंगली घडवण्याचं वातावरण तयार करतात आणि स्वार्थी राजकारणासाठी महाराजांच्या नावाचा वापर करतात. हा तर खरा महाराजांचा अपमान आहे. स्वराज्य म्हणजे प्रेम, शांतता, न्याय आणि लोकांचा सन्मान. पण महाराजांना मानणारे म्हणवून घेऊन जर लोकांची डोकी फोडली जात असतील, तर तो कुठला विचार आहे? या वादानंतर फेक आयडी तयार करून मला अत्यंत गलिच्छ, स्त्रीद्वेषी आणि अपमानास्पद शिव्या दिल्या जात आहेत. ज्यांना खरंच महाराज कळले असते, ते असं वागले असते का? पण त्यांच्या कार्यशाळा, शाखा आणि प्रचारयंत्रणांमधून जर सातत्याने द्वेषच पेरला जात असेल, तर त्याचेच प्रतिबिंब समाजात दिसणार, यात आश्चर्य ते काय? महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न शिवराय, जोतिबा–सावित्री फुले, छत्रपती शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महामानवांचा सामाजिक न्याय, समता आणि कल्याणकारी राज्याचा विचार हा आरएसएसच्या ब्राह्मणवादी विचारसरणीच्या मूलत: विरोधात आहे, त्यांना तो मान्य नाही. म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या वडिलांच्या शब्दांचा विकृत अर्थ लावून, महाराष्ट्रात हिंदू–मुस्लिम तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, तेही शिवजयंतीच्या उंबरठ्यावर! हे एक स्पष्ट राजकीय षड्यंत्र असल्याचा गंभीर आरोप गार्गी सपकाळ यांनी केला आहे. तसेच महाराजांच्या महाराष्ट्रात अशा प्रकारे दूषित वातावरण तयार करून जयंती साजरी करायची, ही वैचारिक विकृतीच म्हणावी लागेल. ज्यांची माथी भडकवली जात आहे, त्यांनी हे ओळखायला हवं की फडणवीस आणि ज्या विचारसरणीतून ते प्रेरित आहेत, ती तुमची फसवणूक करत आहे. तुम्हाला, देशाचं आणि महाराष्ट्राचं ऐक्य जपणाऱ्या माणसांच्या विरोधात उभं केलं जात आहे. आपण अजून किती दिवस या विकृतीला बळी पडणार? ही विकृती तुमचं आयुष्य, तुमचं समाजजीवन आणि शेवटी देशाचं भविष्य उद्ध्वस्त करेल. यापासून सावध राहणं हाच आजचा खरा देशभक्तीचा मार्ग असल्याचे त्या म्हणाल्या. शिवरायांसोबत आमचा पारिवारीक वारसा गार्गी सपकाळ यावेळी सपकाळ घराण्याचा संबंध भोसले आणि जाधवांशी असल्याचे सांगताना म्हणाल्या, शेवटी, महाराजांचा विचार काय आहे हे आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. आम्हाला वैचारिक वारशासोबत पारिवारिक वारसा लाभलेला आहे. आमच्या कुटुंबाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वारशाशी आणि मराठा राजघराण्यांशी जवळचा संबंध आहे. माझ्या वडिलांची मावशी राजर्षी शाहू महाराजांच्या कदमबांडे घराण्यात लग्न झालेली होती. तसेच, माझ्या आजीचे वडील देवासचे सरदार जाधव होते, जे सिंदखेड राजाच्या जाधव घराण्याशी (जिजाऊ मातोश्रींच्या घराण्याशी) जोडलेले आहेत. आणि माझी आत्या बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांच्या वंशज घराण्यात विवाहित आहे. हे सर्व नाते भोसले आणि इतर मराठा राजघराण्यांशी जोडते, पण माझे वडील या ऐतिहासिक वैभवाचा राजकीय उपयोग कधीच करत नाहीत. ही बाब महत्वाची वाटते. ज्यांचा इतिहास अन्याय, शोषण आणि स्त्रीद्वेषाचा राहिलेला आहे, ज्यांना इथली जातीय उतरंड कायम ठेवायची आहे, ज्यांनी सत्तेसाठी गद्दारीची परंपरा जोपासली आहे अशा विचारसरणीच्या लोकांनी तरी महाराजांच्या विचारांचे धडे महाराष्ट्राला देण्याचं ढोंग करू नये. महाराष्ट्र तुमचे डावपेच ओळखतो. महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आणि सर्व धर्मीय बांधवांना माझं एवढंच सांगणं आहे की, आपल्याला प्रेम, करुणा, न्याय आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभं राहायचं आहे, आणि याच मूल्यांवर महाराष्ट्र घडवायचा आहे. सत्य ओळखा, आणि सत्याच्या बाजूने एकजुटीने उभे राहा. खऱ्या स्वराज्यासाठी एकत्र लढा, असे आवाहन गार्गी सपकाळ यांनी केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



