
शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत सादर केल्यामुळे विनोदी कलाकार कुणाल कामरा यांच्याविरोधात मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यानंतर शिवसैनिक संतप्त झाले होते. या प्रकरणात ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसेच महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी कामराचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर शेअर केला होता. त्यानंतर या मुद्द्याला अधिकच राजकीय रंग चढला. या वादानंतर काही नेत्यांकडून विधीमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरोधात हक्कभंगाची तक्रार नोंदवली होती. त्यांच्या मते, विडंबनात्मक गीतातून विधीमंडळ आणि पदांचा अवमान करण्यात आला. जवळपास एक वर्षापूर्वी दाखल झालेले हे प्रकरण आता सुनावणीच्या टप्प्यावर आले आहे. या हक्कभंग प्रकरणाची सुनावणी सुरू होणार असल्याने आज कामरा आणि अंधारे विधिमंडळात उपस्थित राहिले. त्यांनी समितीसमोर आपली बाजू मांडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र प्रत्यक्षात सुनावणी होऊ शकली नाही. कारण ज्यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला ते आमदार प्रवीण दरेकर हे उपस्थित नव्हते. त्यामुळे समितीने पुढील तारखेला सुनावणी ठेवण्याचा निर्णय घेतला. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 मार्च रोजी होणार आहे. आजची सुनावणी न झाल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या. कामरा आणि अंधारे समितीसमोर हजर राहूनही कार्यवाही न झाल्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली, तर भाजपकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असे सांगण्यात आले. एक वर्ष प्रलंबित असलेल्या या विषयावर आता पुढे काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टी-शर्टवर The Constitution of India असा उल्लेख
दरम्यान, आजच्या उपस्थितीत कामराच्या वेशभूषेनेही सर्वांचे लक्ष वेधले. त्यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवर The Constitution of India असा उल्लेख असलेले पुस्तक छापलेले दिसत होते. या प्रतीकात्मक संदेशामुळे सभागृह परिसरात चर्चा रंगली. कामराने याबाबत प्रतिक्रिया देताना आपण संविधानाचा आदर करतो आणि त्यानुसारच आपली बाजू मांडणार असल्याचे स्पष्ट केले. सविस्तर भूमिका मांडण्याची तयारी मी संविधान मानतो आणि त्याच चौकटीत माझे मत व्यक्त करतो, असे सांगत कामराने पुढील सुनावणीत सविस्तर भूमिका मांडण्याची तयारी दर्शवली. तर सुषमा अंधारे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी समितीसमोर हजर राहिल्याचे सांगितले. एकूणच, विडंबन गीतापासून सुरू झालेला हा वाद आता विधीमंडळाच्या हक्कभंग समितीपर्यंत पोहोचला असून पुढील सुनावणीत या प्रकरणाला कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



