
Digital shield for ST security: महाराष्ट्रातील एसटी प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट समोर आलीय. ‘लालपरी’ म्हणजे एसटी बसांच्या प्रवाशांना आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने पूर्ण संरक्षण मिळणार आहे. दहशतवादी हल्ले किंवा इतर समाजविघातक घटनांचा धोका लक्षात घेऊन राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ‘नवीन सीसीटीव्ही प्रकल्प’ हाती घेतलाय. या योजनेत बसस्थानक, आगार, कार्यालये आणि कार्यशाळा यांसारख्या सर्व महत्त्वाच्या जागी डिजिटल नजरेचे जाळे विणले जाणार आहे. यामुळे प्रत्येक हालचाल सतत देखरेखीखाली राहील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
किती निधी मंजूर?
प्रवाशांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य देत महाराष्ट्र सरकारने या प्रकल्पासाठी तब्बल 111 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या पैशातून एसटीच्या बसस्थानके, विभागीय आगार, कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यालये आणि भोसरी येथील प्रशिक्षण केंद्र यासारख्या 633 ठिकाणी एकूण 7035 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. यामुळे संपूर्ण एसटी व्यवस्थेवर डिजिटल नजर ठेवणे शक्य होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
TCIL कंपनीकडे जबाबदारी, एक वर्षात पूर्णता
प्रकल्पाची अंमलबजावणी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (TCIL) या अनुभवी संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. ही कंपनी वेगाने काम करत असून, संपूर्ण प्रकल्प एका वर्षात पूर्ण होईल असा निश्चित कालावधी ठरवण्यात आलाय. यामुळे प्रकल्पाची गुणवत्ता आणि वेग दोन्ही राखले जाणार असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.
मुंबईत केंद्रीय नियंत्रण कक्ष तयार
प्रकल्पाचा मुख्य आधार मुंबई येथे उभारण्यात आलेला मध्यवर्ती नियंत्रण कक्ष आहे. या कक्षाची वापरकर्ता चाचणी (UAT) यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. येथून राज्यभरातील सर्व कॅमेऱ्यांवर एकाच ठिकाणी लक्ष ठेवता येणार आहे. कोणतीही संशयास्पद गोष्ट दिसताच तात्काळ पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणेला सूचना दिली जाणार आहे.
पायलट टप्पा
प्रकल्पाचा पहिला पायलट मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या चार विभागांतील ६४ ठिकाणी यशस्वीरीत्या राबवण्यात आला आहे. यामुळे सुरक्षेची नवी दिशा दिसू लागली आहे. आता उर्वरित 27 विभाग, कार्यशाळा आणि इतर कार्यालयांमध्ये कॅमेरे बसवण्याचे काम जोरात सुरू आहे. लवकरच संपूर्ण राज्यात ही व्यवस्था कार्यान्वित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आलाय.
प्रवास अधिक सुरक्षित
या प्रकल्पामुळे एसटी बसस्थानक आणि कार्यालयांमध्ये सुरक्षेचे नवे युग सुरू होणार आहे. प्रवाशांना आता पूर्ण विश्वासाने प्रवास करता येईल. कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्वरित कारवाई शक्य होईल. मंत्री सरनाईक म्हणाले, हा केवळ कॅमेरे बसवण्याचा प्रकल्प नाही तर ‘लालपरी’ला डिजिटल कवच देणारा ऐतिहासिक निर्णय आहे. यामुळे प्रवास वेगवान, सुरक्षित आणि तंत्रज्ञानाने सज्ज होईल, असे प्रताप सरनाईक म्हणाले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



