digital products downloads

जलवाहिनी फुटली; 2 दिवस पाणीबाणी: गुरुवार, शुक्रवारीच येणार नळाला पाणी, 6 अभियंते, 30 कामगारांकडून दुरुस्ती‎ – Amravati News

जलवाहिनी फुटली; 2 दिवस पाणीबाणी:  गुरुवार, शुक्रवारीच येणार नळाला पाणी, 6 अभियंते, 30 कामगारांकडून दुरुस्ती‎ – Amravati News



पंचवटी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील शिवाजीनगर परिसरात ९० सेंटी मीटर आकाराची व १ मी. व्यासाची सिंभोरा ते तपोवनपर्यंत पाणी घेऊन येणारी जलवाहिनी सोमवारी १६ रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अचानक फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. यामुळे परिसरात असलेल्या मुलींच्या वसतीगृहातही पाणी शिरले. अचानक पाणी रस्त्यावरून वाहायला लागल्याने तत्काळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला सूचना देण्यात आली. त्यानंतर अधिकारी, अभियंत्यांनी शिवाजीनगर परिसरात पोहोचून मुख्य व्हॉल्व्ह बंद केला. तोवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले होते. जलवाहिनी फुटल्यामुळे मंगळवारी सकाळी व सायंकाळी अमरावती शहरासह बडनेरा उपनगराचा पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प राहिला. त्याचप्रमाणे बुधवारीही दिवसभर पाणी पुरवठा होणार नाही. बुधवार १८ रोजी रात्रीपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले तरच गुरुवारी पाणी पुरवठा होईल, अशी माहिती मजीप्राच्या विभागीय उप-अभियंत्यांनी दिली. जलवाहिनी रात्री ११.३० वाजता फुटल्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी साचले होते. जमिनीतून पाणी बाहेर येत असल्यामुळे तसेच ते परिसरात पसरून थेट पीडीएमसी मुलींच्या वसतीगृहात पोहोचल्याने गोंधळ उडाला. रात्री संपूर्ण वस्तीगृहात तळमजल्यावर पाणी साचले होते. जलवाहिनी फुटल्याचे कळताच धावाधाव सुरू झाली. मजीप्राच्या अभियंत्यांचे फोन खणखणायला लागले. तत्काळ अभियंत्यांचा ताफा शिवाजीनगर परिसरात पोहोचला. रात्री दुरुस्तीचे काम शक्य नव्हते. त्यामुळे मुख्य व्हॉल्व्ह बंद करून जेवढे पाणी वाहिनीत होते ते बाहेर जाऊ देण्यात आले. सकाळपर्यंत पाण्याचा दाबही कमी झाला. सिंभोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलन टाकीपर्यंत व तेथून तपोवन येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जी जलवाहिनी टाकण्यात आली ती सुमारे ३२ वर्षे जुनी आहे. १९९४ मध्ये या जलवाहिनीची निर्मिती करण्यात आली होती. ती आता जुनी झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ती वाहिनी अनेकदा फुटते. त्यामुळे अमृत-२ योजनेंतर्गत ८६५.२६ कोटीच्या नव्या जलवाहिनीसह काही जलकुंभ उभारण्यास मंजुरी मिळाली. त्यापैकी २९५.६४ कोटी हे मजीप्राला उभारायचे आहेत. ही रक्कम पाणीपट्टी करातून वसूल करण्याची हमी मजीप्राने घेतली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित रक्कम ही केंद्र सरकार, राज्य सरकार व महानगर पालिकेला उभी करायची आहे. नवी पोलादी जलवाहिनी टाकण्याचे काम २५ टक्के पूर्ण झाले आहे. मंगळवारी सकाळपासून दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. जेसीबीद्वारे प्रथम जलवाहिनीपर्यंत खड्डा खणण्यात आला. तसेच साचलेले पाणी डी-वॉटरिंग पंपाद्वारे बाहेर काढण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम सुरू झाले. ते अहोरात्री सुरू राहणार आहे. पाण्याच्या दाबामुळे जुनी जलवाहिनी फुटली पाण्याचा आतील दाब तसेच रस्त्यांच्या खालून या मुख्य जलवाहिन्यांचे जाळे असल्यामुळे एखादे अवजड वाहन जर रस्त्यावरून गेले तर त्याच्या दाबाने जलवाहिनी फुटू शकते. फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. अनेक जलवाहिन्या या जुन्या झाल्या आहेत. आतून सतत मोठ्या दाबाने पानी वाहत असल्यामुळे त्या काही ठिकाणी वेगवान घर्षणामुळे कमकुवत होतात व फुटतात. ही जलवाहिनी आकाराने मोठी असल्यामुळे दुरुस्तीसाठी किमान दोन दिवस लागणार आहेत. ८६५ कोटीची नवी पोलादी जलवाहिनी टाकण्यास सुरुवात रहाटगाव येथे ११ मे २०२५ रोजी फुटली होती वाहिनी शहराला अप्पर वर्धा जलाशयातून पाणी पुरवठा होतो. सिंभोरा येथील केंद्रातून पाणी हे नेरपिंगळाई मार्गे तपोवन येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाठवले जाते. जुनी जलवाहिनी ही वारंवार पाण्याच्या दाबाने फुटते. त्यामुळे दरवर्षी एक ते दोन वेळा तीन ते चार दिवस शहराचा पाणी पुरवठा बंद राहतो. ११ मे २०२५ रोजी रहाटगांव परिसरात जलवाहिनी फुटली होती. त्यामुळे सुमारे ५ दिवस शहरवासीयांना पाणी मिळाले नव्हते. त्याआधी नेरपिंगळाई येथेही जलवाहिनी फुटल्याने तीन दिवस पुरवठा बंद होता.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp