
Navi Mumbai Airport: नवी मुंबईतील बहुप्रतिक्षित आंतरराष्ट्रीय विमानतळ काही महिन्यांपुर्वीच प्रवाशांच्या सेवेत रुजु झालं. या विमानतळाच्या नजीकच्या ठिकाणीही कॉल न लागणे, इंटरनेट बंद पडणे आणि ऑनलाइन सेवा वापरता न येणे यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून विमानतळ परिसरात लवकरच मोबाइल सेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना आगमन-प्रस्थान करताना कनेक्टिव्हिटीची अडचण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. जाणून घ्या कधीपासून इंटनेट सेवा सुरु होईल?
नवी मुंबई विमानतळावर मोबाइल सेवा सुरू करण्याचा निर्णय
नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (NMIAL) ला दूरसंचार विभागाने स्पष्ट सूचना दिल्या आहेत की परवानाधारक टेलिकॉम कंपन्यांना विमानतळ परिसरात त्यांचे नेटवर्क उभारण्याची परवानगी द्यावी. आतापर्यंत अनेक कंपन्यांना सेवा सुरू करता येत नव्हती. प्रवाशांना बोर्डिंग पास, कॅब बुकिंग, ओटीपी व्यवहार आणि डिजिटल पेमेंट करताना अडथळे येत होते.
टेलिकॉम कंपन्यांच्या अडचणी काय होत्या
विमानतळ प्रशासनाने कंपन्यांनी स्वतःचे टॉवर उभारण्याऐवजी विमानतळावरीलच सुविधा वापराव्यात अशी अट ठेवली होती. तसेच त्या बदल्यात आकारले जाणारे शुल्क जास्त असल्याची तक्रार सेवा प्रदात्यांनी केली होती. त्यामुळे अनेक टेल्को कंपन्यांनी सेवा सुरू करण्यास विलंब केला.
दूरसंचार कायद्यानुसार विमानतळ सार्वजनिक सुविधा मानली जाते. या नियमानुसार परवानाधारक सेवा पुरवठादारांना सेवा सुरू करण्यापासून रोखता येत नाही. त्यामुळे दूरसंचार विभागाने अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडला आवश्यक सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयानंतर नेटवर्क बसवण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे.
प्रवाशांना मिळणारे फायदे
मोबाइल सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना ऑनलाइन चेक-इन, कॅब बुकिंग, डिजिटल पेमेंट, नकाशा वापर आणि संपर्क साधणे सोपे होईल. विशेषतः पहिल्यांदाच येणाऱ्या प्रवाशांसाठी इंटरनेट सेवा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ही मूलभूत सुविधा मानली जाते.
लवकरच पूर्ण कनेक्टिव्हिटीची अपेक्षा
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार विविध दूरसंचार कंपन्या पुढील काही महिन्यांत नेटवर्क उभारणी पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत. सेवा सुरू झाल्यानंतर विमानतळावरील प्रवासी अनुभव अधिक सुकर होईल. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होताना अत्याधुनिक सुविधा देण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



