
सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाने निवडक जागतिक वारसा किल्ल्यांसाठी जतन-संवर्धन आणि पर्यटकांना सोयी उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. या उपक्रमामुळे ऐतिहासिक वारसा सुरक्षित राहण्याबरोबरच पर्यटनालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. किल्ल्यांची ओळख फक्त इतिहासापुरती मर्यादित न ठेवता त्यांना अभ्यास, पर्यटन आणि स्थानिक रोजगार यांचा केंद्रबिंदू बनवण्यावर भर दिला जाणार आहे.
राजगड, खांदेरी आणि साल्हेरवरील कामांना वेग
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याची पहिली राजधानी मानला जाणारा राजगड किल्ला सध्या संवर्धनाच्या मोठ्या टप्प्यात आहे. येथे 4.91 कोटी आणि 10.30 कोटी असा एकूण 15.21 कोटी रुपयांचा निधी वापरून तटबंदी, बुरुज आणि गस्ती मार्ग दुरुस्त केले जात आहेत. पायऱ्या व पदपथ बांधणी, मंदिर परिसराची देखभाल आणि इतर वास्तूंचे संरक्षण ही कामेही सुरू आहेत.
समुद्रकिनाऱ्याजवळील खांदेरी किल्ल्यासाठी 7.93 कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्यासाठीही 7.13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामांमुळे दुर्गभ्रमंती करणाऱ्यांसाठी सुरक्षित मार्ग आणि आवश्यक सुविधा तयार होतील.
प्रतापगडासाठी मोठा विकास आराखडा
सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्यासाठी 127 कोटी रुपयांचा सर्वसमावेशक आराखडा मंजूर करण्यात आला आहे. जतन-संवर्धनाबरोबरच पर्यटकांसाठी माहिती केंद्र, चालण्याचे मार्ग आणि मूलभूत सुविधा उभारण्यावर भर असेल. यासाठी स्वतंत्र प्रतापगड प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून तटबंदी दुरुस्ती आणि बुरुजांचे मजबुतीकरण सुरू आहे.
दरम्यान, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने रायगड, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, पन्हाळा, लोहगड आणि शिवनेरी या किल्ल्यांसाठीही संवर्धन आराखडा तयार करून राज्य शासनाकडे सादर केला आहे. याबाबत करार प्रक्रिया सुरू असून निधीबाबत शासन सकारात्मक असल्याची माहिती मिळते. रायगड विकास प्राधिकरणालाही आवश्यक आर्थिक मदत दिली जात आहे.
हे ही वाचा: शिर्डी साईमंदिरात दर अर्ध्या तासाने वेशांतर करून चोरी करणारी टोळी गजाआड
इतिहास जपतानाच पर्यटनाला चालना देण्याचा हा प्रयत्न यशस्वी ठरल्यास राज्यातील किल्ले भविष्यात अधिक सुरक्षित, आकर्षक आणि अभ्यासासाठी उपयुक्त ठरतील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



