
पुण्यातील विमानतळ पोलिसांनी अहिल्यानगर रोडवरील ‘द रुटस् स्पा’ सेंटरवर छापा टाकला. स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांना पाहून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक पुरुष गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत स्पा मॅनेजर हुसेन शेख याचा पाय मोडला असून, त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत महिला पश्चिम बंगालची रहिवासी असून तिचे वय ३० ते ३५ वर्षांच्या दरम्यान होते. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली. पोलिसांना ‘द रुटस् स्पा’ येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पंचासमक्ष स्पावर छापा टाकला. पोलिसांनी काचेचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, तिथे चार महिला आणि चार पुरुष आढळून आले. याप्रकरणी विमान नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



