
पुणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या भिगवण येथील कथित अपहरण प्रकरणाला आता एक नवे आणि अनपेक्षित वळण मिळाले आहे. संबंधित तरुणीने आपला पूर्वीचा जबाब बदलला असून, आता आपण आई आणि मामासोबत राहण्यास इच्छुक असल्याचे इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात सांगितले आहे. यापूर्वी बारामती न्यायालयात तिने तरुणासोबतच राहण्याचा हेका धरला होता, मात्र पाच दिवसांच्या कालावधीनंतर तिने आपला निर्णय बदलला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी १७ फेब्रुवारी रोजी जहीर शेख या तरुणासोबत निघून गेली होती. या घटनेमुळे भिगवण परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर २० फेब्रुवारीला ही तरुणी बारामती पोलीस ठाण्यात हजर झाली. त्यावेळी बारामती न्यायालयात झालेल्या सुनावणीत तिने आईसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला होता आणि “मला जहीरसोबतच राहायचे आहे,” अशी भूमिका घेतली होती. मुलीची ही ठाम भूमिका पाहता, न्यायालयाने तिची रवानगी महिला पुनर्वसन केंद्रात (सुधारगृह) केली होती. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली सुनावणी सुधारगृहात पाच दिवस राहिल्यानंतर, आज इंदापूर अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणाची पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव तरुणीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (VC) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तिला पुन्हा एकदा कोणासोबत जाण्याची इच्छा आहे, असे विचारले असता, तिने सर्वांना आश्चर्याचा धक्का देत “मला आई आणि मामाकडे जायचे आहे,” असा जबाब दिला. काय होते संपूर्ण प्रकरण? भिगवण येथील ही तरुणी १७ फेब्रुवारीला घरातून बेपत्ता झाल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण दोन वेगवेगळ्या समाजाशी संबंधित असल्याने संपूर्ण राज्यात यावर चर्चा सुरू झाली होती. २० फेब्रुवारीला ती स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाली, पण आईसमोर उभी असतानाही तिने प्रियकराची पाठराखण केली होती. मात्र, सुधारगृहातील पाच दिवसांच्या वास्तव्यानंतर तिने घेतलेल्या या ‘यू-टर्न’मुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. न्यायालयाच्या या नव्या आदेशानंतर आता संबंधित तरुणीचा ताबा तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून राबवली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



