
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामाने उभ्या महाराष्ट्रावर गारूड केलेय. वारकऱ्यांच्या मुखी असणारा ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष त्याचेच प्रत्यंतर देतो. तुकारामांची विठ्ठलभक्ती अनन्यसाधारण होती. विठोबाराया पायी त्यांनी सारे काही त्यागले. छत्रपती शिवाजी महाराजही त्यांच्या आयुष्यात असेच आलेले. तुकारामांच्या वैराग्यवृत्तीने शिवाजी राजांना सुद्धा मोहित केले. हे सारे खूप चकित करणारे असेच. या साऱ्या घटना घडामोडी कशा होत्या, संत तुकारामांचा शेवटचा दिवस कसा होता, त्यांचे विहरिणीचे अभंग म्हणजे नेमके काय? आज संत तुकाराम बीज. त्यानिमित्त जाणून घेऊ महाराष्ट्रात घडलेल्या या अभूतपूर्व अशा गोष्टी… पंढरीचे भूत मोठे । आल्या गेल्या झडपी वाटे ।।१।। बहु खेचरीचे रान । जातां वेडे होय मन ।।२।। तेथे जाऊ नका कोणी । गेले नाही आले परतोनि ।।३।। तुका पंढरीसी गेला । पुन्हां जन्मा नाही आला ।।४।। संत तुकारामांचे अवघे जीवन वैराग्य आणि भक्ती पर्व होते. तुकारामांना दोन बायका होत्या. त्याकाळी भयंकर दुष्काळ पडला. पोटभर खायला न मिळाल्याने त्यांच्या पहिल्या पत्नीचा आणि मुलाचा हाल-हाल होऊन मृत्यू झालेला. त्यांची दुसरी बायको अवलाई. तिला जिजाईही म्हंटले जायचे. अवलाईला पूर्वीच्या तीन मुली आणि दोन मुले होती. त्यांची नावे काशी, भागीरथी, गंगा, महादेव, विठोबा अशी. तुकारामांच्या शेवटच्या दिवसातही अवलाई पाच महिन्यांची पोटुशी होती. तिला पुढे मुलगा झाला. त्याचे नाव नारायण ठेवले. तुकोबारायांच्या मुलींना लोहगावचे मोझे, येळवाडीचे गाडे व जांबळीचे जांबुळकर यांच्या घराण्यात दिलेले. तुकारामांनी आपल्या मुलीचा विवाह खूप घाईघाईत केलेला. या लग्नाची महिपतनीने सांगितलेली गोष्ट मोठी चमत्कारीय. मुली मोठ्या झालेल्या. अवलीस त्यांच्या लग्नाची चिंता लागलेली. तुकाराम विरक्त झालेले. त्यांना फक्त पांडुरंगाचा ध्यास लागलेला. तेव्हा आपल्या मुलीचे कसे होणार, हेच अवलीला वाटायचे. त्यामुळे त्यांनी तुकारामांमागे मुलींच्या लग्नाचा लकडाच लावला. तेव्हा एका दिवशी तुकाराम ताडकन घराबाहेर पडले. काही मुलगे खेळत होते. त्यातल्या तिघांना बोलावले. ब्राह्मण बोलावला आणि आपल्या मुलींची त्या मुलांबरोबर लग्ने लावून दिली. त्यानंतर जावयाला दूधभात जेवू घातला. ही गोष्ट सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. विशेष म्हणजे या घटनेने त्या मुलांच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी पुढे आपल्या खर्चाने चार दिवस लग्नाचा बार उडवला. तुकारामाचा शेवटचा मुलगा नारायण. हा प्रचंड बुद्धिमान. सोबत तुकारामांची भक्ती आणि वैराग्य त्यांच्यात उतरलेले. ते नेहमी हरिभजनात रमत. तुकोबारायांचे सारे अभंग त्यांना तोंडपाठ होते. त्यांचे कीर्तन ऐकायला पंचक्रोशी गोळा व्हायची. पूर्वी एकदा छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांची भेट घेतलेली. तुकारामांच्या वैकुंठगमनानंतरही एकदा शिवाजी महाराज देहूला आलेले. त्यांनी तेथील विठोबाचे दर्शन घेतले. संत तुकारामांच्या घरची परिस्थिती कशी आहे, हे पाहण्यासाठी ते तुकोबारायांच्या घरीही आले. तेव्हा त्यांची नारायण यांची भेट झाली. त्यांची वृत्ती पाहून शिवाजी राजांना परमानंद झाला. त्यांनी पूर्वी संत तुकारामांना जहागिरी देण्यासाठी एक सनद तयार केली होती. तुकारामांचे कीर्तन झाल्याझाल्या ती सनद त्यांना द्यायाची होती. मात्र, तुकाराम अचानक नाहीसे झाले. ती ही सनद शिवाजी महाराजांनी पुढे तुकोबारायांचा मुलगा नारायण महाराजांच्या नावे करून दिली. हे उत्पन्न मिळाल्यापासून तुकारामांनी देहूत स्थापलेल्या विठोबाच्या मंदिराचा खर्च व तेथील वार्षिक समारंभ मोठ्या थाटाने होऊ लागला. संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली भेट साऱ्यांना मंत्रमुग्ध करणारी अशीच आहे. तुकारामांचे अभंग ब्राह्मणांनी इंद्रायणीच्या पाण्यात बुडवले. मात्र, ते तेरा दिवसांनी वर आले. या अभूतपूर्व घटनेची वार्ता सगळीकडे पसरलेली. शिवाजी महाराजांच्या कानीही गेलेली. तुकोबारायांची निःसीम वैराग्यवृत्ती, प्रासादिक अभंगवाणी, सर्वांना आपलेसे करणारे बोल आणि मोहक वकृत्वामुळे त्यांचे कीर्तन रंगत असे. पंढरपूरच्या प्रमुख वारकऱ्यांत त्यांची गणना होऊ लागलेली. शिवाजी महाराजांच्या एका पुराणिकाचा कोंडभट नावाचा शागीर्द होता. तो तुकारामांच्या दर्शनाला गेलेला. त्याला प्रसाद म्हणून दिलेल्या नारळात जडजवाहिरे सापडली. तेव्हापासून तो तुकारामांचा शिष्य झाला. अशा नाना बातम्या शिवाजी महाराजांपर्यंत पोहचत होत्या. तुकारामांसारखा विठ्ठल भक्त दुसरा नाही, अशी कीर्ती शिवाजी महाराजांपर्यंत पोहचलेली. त्यामुळे त्यांना तुकारामांच्या दर्शनाची आस लागली. त्यांनी एक पत्र तुकारामांच्या नावे लिहिले. कारकुनाबरोबर घोडा, छत्री वगैरे लवाजमा दिला. कारकुनाने हे पत्र तुकारामांना दिले. तेव्हा तुकारामांनी आठ अभंग लिहून त्यांना उत्तर दिले. त्यातला एक अभंग असा… दिवट्या छत्री घोडे। हे तों बऱ्यांत न पडे ।।१।। आतां येथे पंढरिराया । मज गोविसी कासया ।।२।। मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा ।।३।। तुका म्हणे देवा । माझे सोडवणे धावा ।।४।। तुकारामांची वैराग्यवृत्ती या अभंगातून व्यक्त होते. कशाचाही मोह नाही. लीनता, सरळता, निरपेक्षता, प्रेमळता हे सारे गुण त्यातून प्रकट होतात. आपले आचरण कायम शुद्ध राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. तुकारामांची ही निस्पृहवृत्ती शिवाजी महाराजांना प्रचंड भावली. ते स्वतः लोहगाव येथे तुकारामांचे कीर्तन ऐकायला आले. राजांनी तुकारामांना सांष्टांग दंडवत घातला. कपाळाला बुक्का लावला. गळ्यात तुळशीच्या माळा घातल्या. फुलांच्या माळा घातल्या. पुढे वस्त्रे, अलंकार, सोन्याच्या नाण्यांनी भरलेले ताट ठेवले. मात्र, तुकारामांनी यातले काहीही स्वीकारले नाही. त्यावेळी त्यांनी सात अभंग म्हटले. त्यातला एक असा… मुंगी आणि राव । आम्हा सारखाचि जीव ।।१।। गेला मोह आणि आशा । कळिकाळाचा हा फांसा ।।२।। सोनें आणि माती । आम्हां समान हें चित्तें ।।३।। तुका म्हणे आले । घरा वैकुंठ सगळे ।।४।। संत तुकारामांच्या या वृत्तीने राजे आणखीच मोहित झाले. त्यांनी आलेले सोनेनाणे तिथेच वाटून टाकले. तुकारामांच्या कीर्तनाचा आनंद घेतला. त्यांच्या अतिशय गोड आणि विद्वत प्रचुर वाणीचे ते वेडे झाले. कीर्तन संपल्यानंतर मुक्कामी गेले. शिवाजी महाराजांनी एकांतवास पत्करला. तुकारामांच्या उपदेशाचे मनन, चिंतन सुरू केले. त्यांच्या ठायी वैराग्य वृत्ती उत्पन्न झाली. त्यांना असे पाहून अष्टप्रधान मंडळी चिंतातुर झाली. त्यांनी जिजाऊस पत्र लिहून कळवले. त्या सुद्धा लोहगावास आल्या. त्यांनी तुकारामांची भेट घेतली. त्यांना सारे कथन केले. आपल्याला एकुलता एक मुलगा आहे. स्वराज्य हेच त्याचे ध्येय आहे. मात्र, तो तुमचे कीर्तन ऐकून आता विरक्त झाल्याचे सांगितले. तो तुमचे कीर्तन ऐकायला येतो. त्याला काही बोध करा, असे साकडेहे घातले. संत तुकारामांचे त्या रात्री पुन्हा कीर्तन सुरू झाले. जिजाऊ त्याठिकाणी होत्याच. सोबतच शिवाजी महाराजाही आलेले. त्यावेळी तुकाराम महाराजांनी स्वमोक्षासाठी संसार त्याग करण्यात काहीच हाशील नाही. फक्त संसारात नीतीने वागावे. परोपकार करावा. हरिभक्ती करावी, असे आवाहन केले. राजा सदाचारी असावा, त्याने लोककल्याण करावे, प्रजापालन कसे करावे, या साऱ्यावर बोलले. आणि शिवाजी महाराजांची वैराग्य वृत्ती पुन्हा स्वराज्याच्या ध्येयाकडे आली. तुकारामांचे वकृत्व होतेच असे. तुकोबारायांचा शेवटचा काळ काळजाला प्रचंड चटका लावणारा असाच आहे. संत तुकाराम आषाढी आणि कार्तिकीची पंढरपूर वारी कधीही चुकवत नसत. मात्र, एकावेळेस त्यांची प्रकृती बिघडली. शीतज्वराची बाधा झाली. अंगात शक्तीच उरली नाही. साधे चार पावले चालणेही अशक्य झाले. त्यांच्या मनाला चटका लागला. एकीकडे चौदाशे वारकरी वैष्णवांची पताका घेऊन पंढरपूरला जाण्यासाठी देहूला जमले. अतिशय जड अंतकरणाने तुकारामांनी त्यांना निरोप दिला. त्यांच्यासोबत विठोबारायाला छत्तीस अभंगाचे पत्र लिहून पाठवून दिले. त्यातला एक अभंग असा… विनवीजे ऐसे भाग्य नाहीं देवा । पायाशी केशवा सलगी केली ।।१।। धीटपणे पत्र लिहिलें आवडी । पार नेणें थोडी मति माझी ।।२।। जेथे वेग तुझा नकळेची पार । तेथें मी पामर काय वाणूं ।।३।। जैसे तैसे माझे बोल अंगीकारीं । बोबड्या उत्तरीं मस्तक हे ।।४।। तुका म्हणे विटेवरि जी पाऊले । तेथे म्या ठेवियले मस्तक हे ।।५।। संत तुकारामांनी विठ्ठलाला लिहिलेले हे अभंगरूपी पत्र अक्षरशः एका व्याकूळ हृदयाच्या भक्ताची भावस्थितीय. हे अभंग वाचून वारकऱ्यांची काळीज हेलावले. त्यांचा कंठ दाटून आला. त्यांनी उभ्याउभ्या तुकोबारायाला अलिंगन दिले. आणि पंढरीस निघाले. तुकाराम त्यांना निरोप देण्यासाठी गावाबाहेर आले. वारकऱ्यांचा जाणारा जत्था पाहून ते तिथेच थांबले. तिथून त्यांचा पाय काही निघेना. तुकारामांचे हे अभंगरूपी पत्र वारकऱ्यांनी विठोबाच्या चरणी अर्पण केले. तुकारामांची तब्येत ठीक नाही. त्यामुळे त्यांना येणे झाले नाही, हा निरोप दिला. त्यांच्यावर क्षोभ करू नका, अशी विनवणी केली. इकडे वारकरी गेल्यापासून तुकारामांनी पंढरीचा ध्यास घेतलेला. त्यांच्या ध्यानी, मनी, स्वप्नी फक्त पंढरपूर, विठोबा आणि तिथला सोहळा होता. या अवस्थेत त्यांनी आणखी एकोणीस अभंग लिहिले. त्यातला एक अभंग असा… माहेरींचा काय येईल निरोप । म्हणऊनी झोप नाही डोळां ।।१।। वाट पाहें आस धरूनियां जीवीं । निढळा हे ठेवीं वरी वाहे ।।२।। बोटवरी माप लेखितों दिवस । होतां कासावीस धीर नाहीं ।।३।। काय नेणों संता पडिला विसर । कीं नव्हे सादर मायबाप ।।४।। तुका म्हणे तेथे होईल दाटणी । कोण माझें आणी मना तेथें ।।५।। संत तुकाराम देहूमध्ये होते. मात्र, त्यांचे सारे चित्त पंढरीत. विठोबामध्ये आणि एकादशी उत्सवात होते. त्यांना विठोबाची आस लागलेली. एकदाशी सोहळा संपत आला. त्यांचे डोळे आता वारकऱ्यांकडे लागलेले. देहू गावातून ज्या ठिकाणी त्यांनी वारकऱ्यांना निरोप दिला होता, त्याच ठिकाणी तुकोबाराय पोहचले. वारकऱ्यांची वाट पाहू लागले. वारकरी येत असल्याचे दिसताच ते लगबगीने सामोरे गेले. त्यांना सांष्टांग दंडवत घातला. त्यांनीही तुकोबारायांची गळाभेट घेतली. पांडुरंगाचा आणलेला प्रसाद दिला. तुकोबांनी पंढरपूरचा उत्सव कसा झाला, हे मोठ्या उत्सुकतेने विचारले. तिथल्या अनुपम्य सोहळ्याचे वर्णन करून वारकरी आपापल्या घरी गेले. यावेळी सुद्धा तुकोबारायांनी अकरा अभंग लिहिले. त्यातला एक अभंग असा… आजीचिया लाभे ब्रह्मांड ठेंगणें । सुखी झालें मन कल्पवेना ।।१।। आर्तभूत माझा जीव जयांसाठी । त्यांच्या झाल्या भेटी पायांसवें ।।२।। वाटुली पाहता सिणले नयन । बहु होते मन आर्तभूत ।।३।। माझ्या निरोपाचे आणिले उत्तर । होईल समाचार सांगती तो ।।४।। तुका म्हणे भेटी निवारला ताप । फळले संकल्प संत आले ।।५।। तुकोबाराय या घटनेपासून उदास राहू लागले. त्यांच्यात संचारणारा उत्साह मावळला. मात्र, कीर्तने सुरूच होती. एकदा कीर्तन सुरू केले की, त्यांना काळ आणि वेळेचे भान रहात नसे. त्यांना कोणी कीर्तन सुरू होऊन बराच वेळ झाल्याचे सांगितले, तरी ते तिकडे लक्ष देत नसत. अखंड अभंग, अखंड नामस्मरण. कोणाशी बोलतानाही अभंगातूनच बोलत. एखाद्या ठिकाणी बसले की, ते तासंनतास तिथेच बसत. तुकोबा कोणालाही निरोप न देता दुसऱ्या गावी जात. त्यांचे शिष्य त्यांना शोधण्यासाठी पंचक्रोशी धुंडाळत. कोणी कुठे चाललात?, असे विचारले. तर त्यांचे उत्तर असे ‘वैकुंठपुरी चाललोय.’ कीर्तनातही ते विठोबाला आळवत. सतत म्हणत, ‘पांडुरंगा हे लोक मला आपल्या घरी नेतात. गोडधोड जेवू घालतात. माझा मानपान करतात. ते मला आवडत नाही. त्यामुळं मी बिघडू शकतो. आता या लोकी जास्त काळ ठेवू नकोस. वैकुंठास घेऊन चल. माझे आयुष्य उणे कर. मी जिवंत असेपर्यंत ठणठणीत असू दे. कारण माझ्या शेवटापर्यंतही मला तुझी भक्ती करायचीय. नेमकी याच काळात ती भयंकर घटना घडली. तुकोबाराय लोहगावला महिनोमहिने रहात. कीर्तन करत. ते नेहमीप्रमाणे लोहगावला आलेले. त्यांचा कीर्तन सोहळा सुरू असलेला. मात्र, अचानक तिथे मोठी लुटालूट झाली. लोकांचे धनधान्य, संपत्ती लुटून नेली. ते दुःखी, कष्टी झाले. मात्र, तुकारामांच्या विचारांनी त्यांना तारले. तिथेही त्यांनी आपल्या कीर्तनातून आणि अभंगातून त्यांना मोठे बळ दिले. त्यातलाच एक अभंग असा… गेलीयाची हळहळ कोणी ।। नका मना धरू कांहीं ।।१।। पावलें तें म्हणो देवा ।। सहज सेवा या नांव ।।२।। जळता अंगी पडता खाण ।। नारायण भोगिता ।।३।। तुका म्हणे नलगे मोल ।। देवबोल आवडती ।।४।। तुकोबारायांना लोहगावच्या भक्तांचे दुःख असह्य झाले. त्यांचे दारिद्र्य पाहणे नको झाले. त्यांचे त्यांच्यावर प्रचंड प्रेम होते. त्या भक्तांची तुकोबारायांवर निस्सीम भक्ती होती. त्यामुळे त्यांची ही स्थिती पाहण्यापेक्षा हे जीवन नको, असा विचार तुकोबारायांच्या मनात येऊ लागला. त्यामुळे ते दिवसेंदिवस अतिशय निराश होत चालले. त्यांनी पांडुरंगाचा धावा पुकारला. आपल्याला वैकुंठाला घेऊन जावे, असा घोष लावला. त्यापैकीच हा एक अभंग… न देखवे डोळां ऐसा हा आकांत ।। परपीडे चित्त दुःखी होतें ।।१।। काय तुझी येथे नसालसे झालें ।। आम्हीं न देखिलें पाहिजे हें ।।२।। परचक्र कोठे हरिदासांच्या वासें ।। न देखिजेत देशें राहातिया ।।३।। तुका म्हणे माझी लाजविली सेवा ।। हीनपणे देवा जिणे झालें ।।४।। लोहगावचे अनेक भक्त या लुटालुटीमुळे विरक्त झालेले. त्यांना हे असे जगणे नकोसे वाटू लागले. तुकारामांच्या संगतीचा ध्यास लागला. जेव्हा तुकाराम लोहगावहून देहूला निघाले, तेव्हा अनेक वारकरी त्यांच्यासोबत निघाले. मात्र, लोहगावच्या घटनेने तुकारामांना एक प्रकारचा चटका लागला. ती जखम काही केल्या भरून निघाली नाही. त्यांना इथून पुढे एकसारखा वैकुंठाचा ध्यास लागला. फाल्गुन महिन्यातला उत्सव आला. तुकोबांचे शुक्ल पक्षातल्या एकादशीपासून पाच दिवस कीर्तन चालले. ऐश्वर्य, सुखाची अस्थिरता आणि विरक्तता, भक्ती याचेच समुपदेशन तुकोबारायांनी केले. त्यांना वैकुंठगमनाची आस इतकी लागली की, तो सोहळाच होतोय असा भास होऊ लागला. सारी गात्रे शिथिल झाली. कामे पूर्वीसारखी उत्साहाने होईनात. त्यांचे मन दिवसेंदिवस खंगू लागले. आता इथ राहण्यात मजा नाही, असा वाटू लागले. ही खिन्नता त्यांच्या अभंगातूही जाणवू लागली… माहेरीचा मज आलासे मुळारी । उद्या प्रातःकाळीं जाणे मज ।।१।। बहु काळ माझा केलासे सांभाळ । पांडुरंगे मूळ पाठविलें ।।२।। हीच आम्हां भेटी लोभ असों द्यावा । पुन्हा मी केशवा नयें येथें ।।३।। तुका म्हणे बहु न बोलों उत्तर । दया आता फार असों द्यावी ।।४।। फाल्गुन वद्य प्रतिपदा. तुकोबारायांचे रात्रभर कीर्तन झाले. शेवटी अती भक्तीने आरती. त्यांनी विठोबारायस सांष्टांग दंडवत घातला. देवळातून मोठमोठ्याने अभंग म्हणत इंद्रायणीच्या तीराकडे पावले वळवली. सोबत पाठीमागे वारकरी भक्त होतेच. तुकोबांनी पत्नी अवलीला आम्ही वैकुंठास चाललो, भेटण्यास यावे, असा निरोप धाडला. मात्र, तिने माझ्यासोबत लेकरंबाळं आहेत. मी पोटुशी आहे. अशा स्थितीत तुमच्यासोबत येणे शक्य नसल्याचे कळवले. या निरोपालाही तुकारामांनी एका अभंगातून उत्तर दिले. ते असे… स्तियेसीहो तुका जातो सांगोनिया ।। बैसा म्हणोनिया जातों आम्हीं ।।१।। सडासंमार्जन तुळसी वृदांवन ।। देवाचें पूजन करीत जावें ।।२।। तुझिये गर्भी आहे नारायण ।। तो तुजलागाने उद्धरील ।।३।। ऐसे बोलोनिया तुका पुढें आले ।। सद्गदित झाले हृदय तिचे ।।४।। तुकोबारायांच्या या निरोपाचा अर्थच अवलीला कळाला नाही. तुकाराम सारखे म्हणत आम्हाला वैकुंठाला जायचे आहे. विठोबाला भेटायला जायचे आहे. अवलीने आताही तोच अर्थ घेतला. तुकोबाची तीच भाषा, तीच भक्ती, तोच विठोबा आणि तीच त्याचा भेटण्याची आस. मात्र, ही खरोखरच शेवटची निरवानिरव सुरू आहे, हे तिला तर माहिती नव्हतेच. सोबतच तुकोबारायांच्या पाठीमागे आणि सोबत चालणाऱ्या त्यांच्या भक्तांना आणि वारकऱ्यांना देखील याची पुसटशीही कल्पना नव्हती. तुकोबांचे सारे लक्ष मात्र, पंढरीच्या पांडुरंगाकडे लागलेले. जणू काही तोच त्यांना बोलावत होता. तुकोबांनी इंद्रायणी जवळ केली. इथे सुद्धा कित्येक अभंग म्हटले. या अभंगाला ‘विहरिणीचे’ अभंग म्हणतात. यातूनच त्यांनी आपल्या भक्तांना शेवटचा निरोप दिला. उठा एक आतां सांगतों तुम्हाला । देशनटा आला आम्हालागीं ।।१।। इंद्रायणीवरी उतरलीं विमाने । आम्हापासी आले विष्णुदूत ।।२।। मृत्युलोकी माझे पूर्ण झाले मन । गाईले कीर्तन विठोबांचे ।।३।। साधुसंता पायी गेलो लोटांगणी । नित्य गर्जे वाणी विठ्ठलनामे ।।४।। आतां एक ऐका सांगतो तुम्हासी । जावे पंढरीसी सर्व काळ ।।५।। तुम्ही कोणी करा हरिनामकीर्तन । ऐसें तुम्हा सांगोन जातो तुका ।।६।। तुकोबांच्या अभंगाचा अर्थबोध, भाव आता त्यांच्या भक्तांच्या हृद्यात पोहचला. ते सुद्धा विकल झाले. तुकोबांनी त्यांचा शेवटचा निरोप घेतला. विठोबाच्या भजनाचा, प्रेमाचा आणि भक्तीचा कल्लोळ आता वाढलेला. या मनीचे भाव त्या मनी पोहचले. अनेक भक्तांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्यांना शोक अनावर झाला. जणू त्यांचे भान हरपले गेले. अशा क्षणी अचानक संत तुकारामांनी इंद्रायणीच्या डोहात उडी घेतली. सारे जमलेले वारकरी, भक्तांना काही कळायच्या आत तुकाराम अदृश्य झाले. त्यांचा असा समज झाला की तुकाराम सदेह वैकुंठाला गेले. याचे कारण म्हणजे निरोपाच्या वेळी तुकारामांनी म्हणलेले अभंग. ते असे… कुडीसहित तुका जाईल वैकुंठासी । ते गुज तुम्हांसी कळलें नाही ।।१।। पुढे जे होईल ते जाणे विठ्ठल । लौकिकां कळेल काय तेथे ।।२।। तुका म्हणे आता काया ब्रह्म झाली । विमाने उतरली आम्हांलागी ।।३।।
तुका उतरला तुकीं । नवल झाले तिहीं लोकीं ।।१।। नित्य करितो कीर्तन । हेंची त्याचें अनुष्ठान ।।२।। तुका बैसला विमानीं । संत पाहती लोचनीं ।।३।। देव भावाचा भुकेला । तुका वैकुंठासी गेला ।।४।। संत तुकाराम अचानक गुप्त झाले. कोणाला काही कळेना. साऱ्यांना प्रचंड दुःख झाले. वारकरी अत्यंत उदास झाले. तुकोबारायांची वाट पाहून पाहून थकले. शेवटी पाणावलेले डोळे आणि हुंदका घेऊन ते गावात आले. मात्र, तुकोबारांचे अत्यंत जवळचे चौदा वैष्णव त्यांची वाट पाहात इंद्रायणीतीरी बसले. त्यात तुकोबांचा भाऊ कान्हया, रामेश्वरभट्ट गंगाजी, मवाळ कडूसकर होते. तुकारामांचे दर्शन झाल्याशिवाय उठायचे नाही, असा निर्धार त्यांनी केला. अवलीला हे सारे समजले. ती मुलांसह धावत आली. आक्रोश करू लागली. हे सारेच पंचमीपर्यंत तिथेच बसून राहिले. मात्र, तुकोबाराय काही आले नाहीत. या साऱ्यांना तुकोबांची गोधडी व टाळ दिसली. तेव्हा भक्तांना वाटले की, तुकोबांनी गोधडी व टाळ खाली टाकून मी वैकुंठास गेलो. तुम्ही घरी जावे, असे सुचवले आहे. शेवटी अवली, मुले आणि सारे भक्त अतिशय दुःखी होऊन गावात आले. तुकोबा सदेह लोप पावले. त्यामुळे त्यांचे किर्याकर्म न करता भोजन, कीर्तन आणि सप्तमीस लळीत केले गेले. संत तुकारामांचे खरेच स्वर्गारोहण झाले का, हा वादाचा विषयय. ‘तुकारामबावांचे चरित्र’ या ग्रंथात चरित्रकार कृष्णराव अर्जुन केळूसकर यांनी ‘चमत्कार’ प्रकरणात यावर सविस्तर प्रकाश टाकला आहे. ते म्हणतात, ‘अखेर शेवटी तुकाराम देहासकट वैकुंठास गेला किंवा नाही याविषयीचा वाद राहिला. त्याचा निर्णयही तुकारामांच्या एतद्विषयक वचनांवरूनच सहजी होण्यासारखा आहे. मागे आम्ही तुकारामाच्या स्वर्गारोहणसमयाचे काही अभंग दिले आहेत त्यात शेवटी हे शब्द आहेत… झाला पाठमोरा इंद्रायणीतीरीं । नामघोष टाळी वाजविली ।। प्रथम तो पाय घातला पाण्यांत । राहिली ते मात तुका म्हणे ।। केळूसकर पुढे म्हणतात, ‘यावरून हे स्पष्ट होते की, तुकारामाने जलसमाधी घेतली. त्याने देहासकट विमानात बसून स्वर्गारोहण केले व मग वरून गोधडी व टाळ ही खाली टाकली, अशी अद्भुत कथा लोकांनी मागाहून रचली असून तीत काही तथ्य आहे, असे आम्हास वाटत नाही. पुन्हा असे पाहा की, इहलोक सोडून स्वर्गादिकांप्रत जाण्याच्या संबंधाने जेवढ्या म्हणून कल्पना आहेत त्यामध्ये येथला देह येथेच ठेवून आत्मा जातो असे मानण्याची प्रवृत्ती आहे व याप्रमाणे देहासकट कोणी स्वर्गास गेल्याचे एकही उदाहरण पुराणग्रंथांत नाही. असे असता तुकारामाच्याच संबंधाने हा अद्भुत प्रकार कसा घडला? असा प्रश्न उत्पन्न होतो.’ कृष्णराव केळूसरकर म्हणतात, ‘तर या प्रकरणी असा तर्क करण्यासारखा आहे की, तुकारामाने “देहासकट तुका गुप्त झाला” वगैरे जी वचने अंतकाळी म्हटली त्यावरून पुढे लोकांनी ही अद्भुत कथा रचली असावी. ती वचने कल्पनाशक्ती अनिवार्य झाल्यामुळे तुकारामाच्या तोंडातून निघाली असावी, असे मानण्यास त्याला काहीएक कारण वाटले नाही. त्यांचा चमत्कारावर पूर्ण भरवसा असल्यामुळे असा विवेक त्यास व्हावा कोठून? महिपतीने लिहिलेल्या कथेवरून एकंदरीत पाहता तुकाराम देहासकट स्वर्गास गेला नाही असेच सिद्ध होते.’ कृष्णराव केळूसर म्हणतात, ‘महिपती म्हणतो की, फाल्गुन वद्य द्वितीयेस तुकाराम गुप्त झाला असता त्याचे शिष्य व त्याची बायको अवलाई ही इंद्रायणीतीरी पंचमीपर्यंत होती. जर तो वर गेला हे त्यास खास ठाऊक असते, तर ती इतके दिवस तेथे बसून राहिली नसती; परंतु वास्तविक प्रकार, जो खुद्द तुकारामाच्या पूर्वी दिलेल्या अभंगात दर्शविला आहे, तो घडला असल्याकारणाने तो पुन्हा डोहातून वरती येईल या आशेने ती तेथे बसली होती हे उघड आहे. कारण ज्या डोहातून पुन्हा तेरा दिवसांनी अभंगाच्या गाथा वरती आल्या त्याच डोहातून तुकाराम पुन्हा वरती येणार नाही कशावरून? असे त्यास वाटणे साहजिक होते. याप्रमाणे कोणीकडूनही पाहता हा देहासकट स्वर्गारोहण करण्याचा निसर्गविरुद्ध चमत्कार तुकारामाच्या हातून घडला नाही असेच म्हणावे लागते.’ तुकोबा होतेच असे. जणू दुसरा ज्ञानेश्वर. दोघांची भक्ती, दोघांची युक्ती आणि दोघांचे विचार एकसारखे. एकाला लपवावे आणि दुसऱ्याला काढावे. ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी पसायदान मागितले. तुकारामांनी आपल्या भक्तांना ‘कोणाही जिवाचा न घडो मत्सर हे आवाहन केले.’ त्यामुळे प्रिय तुकोबांनी अजूनही साऱ्यांना वेड लावलेले आहे. त्यांचा या प्रचंड प्रिय अभंगाने आपण थांबूयात… विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।। भेदाभेद भ्रम अमंगळ ।।१।। आइकाजी तुम्ही भक्त भागवत ।। कराल तें हित सत्य करा ।।२।। कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।। वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।३।। तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे ।।४।।
(संदर्भः तुकारामबावांचे चरित्र – कृष्णराव अर्जुन केळूसकर)
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



