
जगातील बडे उद्योग राज्यात येतील या आशेने जनता दावोस दौऱ्याकडे पाहत होती, पण मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाऊन चक्क मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या आणि कांदिवलीतील छोट्याशा गाळ्यात चालणाऱ्या कंपन्यांशी हजारो कोटींचे करार केले आहेत. आकडे फुगवून राज्याच्या सुशिक्षित तरुणांना फसवायचे आणि महाराष्ट्राच्या संपत्तीची बोगस कंपन्यांना लूट करायला द्यायची, हेच या सरकारचे धोरण आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला. नाना पटोले म्हणाले की, ज्या कंपनीचे वर्किंग कॅपिटल केवळ 4 ते 5 लाख रुपये आहे आणि जी कांदिवलीतील एका छोट्या इमारतीत सुरू आहे, त्या कंपनीसोबत सरकारने 4 हजार कोटींचा करार केला. ही कंपनी राज्यात 6 हजार रोजगार देणार, असा दावा सरकारने केला आहे. करार करण्यापूर्वी कंपनीची आर्थिक क्षमता तपासली जात नाही का? असा सवाल पटोले यांनी केला. मंत्रालयातील लोकांशी दावोसमध्ये ‘सेटिंग’? नाना पटोले म्हणाले की, मंत्रालयाच्या आसपास असणाऱ्या लोकांशी आणि लोंढा यांच्या कंपनीशी करार करण्यासाठी जनतेचा पैसा खर्च करून दावोसला जाण्याची काय गरज होती? हे करार मंत्रालयात बसूनही करता आले असते, असा टोला लगावत पटोले यांनी या दौऱ्यातील ‘टीम’वर झालेल्या खर्चावरून सरकारला धारेवर धरले. लोढा, अदानी, एसबीजी ग्रुप, कल्याणी आणि बालासोर यांसारख्या मोठ्या नावांच्या आडून बोगस कंपन्यांचे हित जपले जात असल्याचे त्यांनी म्हटले. महाराष्ट्राच्या संपत्तीची लूट आणि श्वेतपत्रिकेची मागणी पटोले यांनी उद्योगांच्या नावाखाली जमिनी लाटण्याचा डाव असल्याचेही सांगितले ते म्हणाले की, अहिल्यानगरमध्ये महामंडळाची 4 हजार एकर जमीन एमआयडीसीला देऊन ती उद्योजकांच्या घशात घालण्याचे प्लॅनिंग सुरू आहे. श्वेतपत्रिका काढा नाना पटोले म्हणाले की, गेल्या 5 वर्षांत दावोसमध्ये नेमके किती करार झाले, त्यातील किती उद्योग प्रत्यक्षात जमिनीवर उतरले आणि किती रोजगार मिळाले, याची श्वेतपत्रिका सरकारने काढलीच पाहिजे. बेरोजगारांचा महाराष्ट्र अशी ओळख नको! नाना पटोले म्हणाले की, शाहू, फुले, आंबेडकरांचा प्रगत महाराष्ट्र आता ‘बेरोजगारांचा महाराष्ट्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. खोटे करार करून मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करत आहेत, ही अत्यंत शरमेची बाब आहे, अशा शब्दांत पटोले यांनी आपला संताप व्यक्त केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



