
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या 378 व्या बीज सोहळ्यानिमित्त गुरुवारी अवघी देहूनगरी तुकोबांच्या जयघोषाने आणि भक्तिभावाने दुमदुमली. भजनी दिंड्यांचा रात्रभराचा जागर, काकडा आरती, महापूजा आणि टाळ-मृदंग-चिपळ्यांच्या साथीने होणाऱ्या हरिनामाच्या गजरात लाखो भाविकांनी इंद्रायणीचा काठ फुलवून टाकला होता. दुपारी ठीक बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करत आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी या सोहळ्याचा परमोच्च क्षण अनुभवला, ज्यामुळे संपूर्ण देहू परिसरात एक अनोखे भक्तिचैतन्य पसरले होते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठगमन झाले होते. त्यानिमित्ताने हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. आजच्या दिवशी राज्यभरातून लाखो वारकरी देहू येथे दाखल होतात. पहाटे 3 वाजता मुख्य देऊळवाड्यात काकडा आरती झाली. त्यानंतर 4 वाजता संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आणि विश्वस्तांच्या हस्ते देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील, वैकुंठगमन स्थान येथील पूजा पार पडली. सकाळी साडेदहा वाजता हरिनामाच्या जयघोषात पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले, जिथे कीर्तनातून वैकुंठगमनाचा भक्तिमय प्रसंग उलगडण्यात आला. साडेअकरा वाजता पालखीची मंदिराला प्रदक्षिणा झाल्यानंतर दुपारी 12 वाजेपर्यंत विठ्ठल-तुकोबांच्या नामाचा गजर सुरू होता आणि ठीक 12 वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी एकच जल्लोष केला. अलोट गर्दीच्या उपस्थितीत आणि चैतन्यमयी वातावरणात दुपारी साडेबारा वाजता पालखीचे मुख्य देऊळवाड्यात पुनरागमन झाले. अशा पद्धतीने एकंदरीत हा 378 वा बीज सोहळा अत्यंत मंगलमयी पद्धतीने संपन्न झाला. बीज सोहळ्यासाठी होणारी भाविकांची अलोट गर्दी लक्षात घेता प्रशासनाने सुरक्षेचे आणि नियोजनाचा चोख बंदोबस्त केला होता. येथील मुख्य मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असून पोलिस आणि प्रशासनाचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विशेषतः गर्दीचे नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी एक ठोस आराखडा तयार करण्यात आला असून, प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवर वाहतूक पोलिसांची विशेष नियुक्ती करण्यात आली होती.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



