
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांची निवडणूक बिनविरोध झाली असली, तरी महाविकास आघाडीतील (मविआ) अंतर्गत धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. “मविआमध्ये सर्वात जास्त आमदार असलेला पक्ष असूनही आम्हाला डावलून तिसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला संधी मिळाली,” अशा शब्दांत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. या निर्णयामुळे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आता २०२९ पर्यंत पुन्हा संधी मिळणे कठीण असल्याचे सांगत त्यांनी आपली सल व्यक्त केली. राज्यसभेच्या महाराष्ट्रातील ७ जागांसाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. भाजपकडून ४, शिंदेंच्या शिवसेनेकडून १, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून १ अर्ज दाखल करण्यात आला. तर महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ७ जागांसाठी ७ अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीकडून शरद पवार यांनी देण्यात आलेल्या उमेदवारीवरून आदित्य ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? राज्यसभेच्या ७ जागांपैकी १ जागा महाविकास आघाडीच्या वाटेवर येणार होती. ही जागा शिवसेनेला मिळावी यासाठी आदित्य ठाकरे आग्रही होते. मात्र, शरद पवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यावर मविआने त्यांच्या नावाला पसंती दिली यावर भाष्य करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आम्ही महाविकास आघाडीत काही नियम पाळत होतो, त्यानुसार जो सर्वात मोठा पक्ष असतो, त्याला पहिली संधी मिळायला हवी होती. आमचा पक्ष मोठा असूनही संधी तिसऱ्या नंबरच्या पक्षाला (राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) मिळाली. मी जो दावा करत होतो तो निस्वार्थीपणे आणि माझ्या पक्षाच्या हितासाठीच होता.” वाद नको म्हणून संमती दिली आघाडीत बिघाडी होऊ नये, यासाठीच आपण नमती भूमिका घेतल्याचे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “राज्यसभेचा जो काही निर्णय झाला तो इंडिया आघाडी म्हणून झाला. या जागेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आम्हीही दावा केला होता. ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या नावावर एकमत झाले होते. आम्हाला इंडिया आघाडीत कोणताही वाद नको होता, म्हणून आम्ही त्यांच्या निर्णयाला संमती दिली,” असे त्यांनी सांगितले. मात्र, ही संमती देताना मनातील सल त्यांनी लपवून ठेवली नाही. २०२९ पर्यंतची मोठी प्रतीक्षा आदित्य ठाकरे यांनी भविष्यातील राजकीय अडचणींकडेही लक्ष वेधले. “आताची संधी हुकल्यामुळे आम्हाला कदाचित २०२९ पर्यंत पुन्हा राज्यसभेसाठी संधी मिळणार नाही. २०२८ मध्ये काँग्रेस आपला दावा करू शकते. या सर्व गोंधळात मतांचा कोटाही वाढत चालला आहे. त्यामुळे मी जे काही सांगत होतो ते निस्वार्थीपणे सांगत होतो. ती भूमिका माझ्या पक्षासाठी होती,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



