
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘आदर्श व्यापारी ‘उत्तम’ पुरस्कारां’चे वितरण करण्यात आले. यावेळी बोलताना गडकरी यांनी माहिती आणि तंत्रज्ञान हा आधुनिक व्यापाराचा पाया असल्याचे सांगितले. व्यापाऱ्यांनी काळाची पावले ओळखून व्यापार पद्धतीत बदल घडवल्यास अधिक वृद्धी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा पुरस्कार सोहळा दि पूना मर्चंटस् चेंबरतर्फे व्यापार महर्षी स्व. उत्तमचंदजी उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आला होता. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपूरे, दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, उपाध्यक्ष अजित बोरा, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड आणि माजी अध्यक्ष रायकुमार नहार आदी मान्यवर उपस्थित होते. यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार जस्ट युनिवर्सल प्रा. लि., नागपूरचे उज्वल पगारीया यांना प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय पुरस्कार चितळे उद्योग समूह, पुणेचे संजय उर्फ गोविंद चितळे यांना, तर पुणे शहरस्तरीय पुरस्कार रेनबो हाऊसिंग, पुणेचे सुनील नहार यांना मिळाला. दि पूना मर्चंटस् चेंबर सभासद पुरस्कार मे. नवीन पेढी, पुणेचे जयभगवान गोयल यांना, तर युवा सभासद पुरस्कार मे. विरल इंटरनॅशनल, पुणेचे विरल पटेल यांना देण्यात आला. याशिवाय, दै. लोकसत्ताचे राहुल खळदकर यांना कै. वि. ल. गवाडीया आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नितीन गडकरी आपल्या भाषणात म्हणाले की, कोणताही व्यवसाय एका रात्रीतून उभा राहत नाही, तर त्यामागे अनेक पिढ्यांचे योगदान, त्याग आणि समर्पण असते. व्यापारी यश-अपयश, मान-सन्मान आणि अपमानाच्या हिंदोळ्यावर प्रवास करत असतो. भूतकाळातील अनुभवांच्या जोरावर तो यशस्वी भविष्याकडे वाटचाल करतो. पिढीजात व्यवसाय असला तरी व्यापारी होणे ही मूळ वृत्ती आहे, जी अंगी भिनल्यावरच व्यापाराचा विस्तार होतो. सचोटी, प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ही व्यावसायिक मूल्यांची कास धरूनच वाटचाल करावी लागते. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि तो धाडसाने निभावून नेणे ही व्यावसायिकाची गुणवैशिष्ट्ये आहेत. व्यवसायातून केवळ संपत्तीच नाही, तर रोजगाराचीही निर्मिती होते, ज्यामुळे बेरोजगारांना काम मिळते आणि गरिबी दूर होते, असेही गडकरींनी नमूद केले. पुणे शहरात प्रचंड क्षमता असून, त्या क्षमतांना चालना देण्यासाठी शहराभोवती रिंगरोडचे जाळे निर्माण केले जात आहे. या रिंगरोडमुळे पुण्यात मोठी गुंतवणूक येईल आणि पर्यावरणाचे संतुलन राखत शाश्वत विकासाच्या दिशेने पुणे वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



