
राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह ओसंडून वाहत असताना सोलापूर शहरात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. सोलापूर महानगरपालिकेत मराठा समाजाला महापौरपदाची संधी नाकारल्याच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज ‘काळी रंगपंचमी’ साजरी करण्यात आली. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मराठा समाजातील पात्र उमेदवारांऐवजी स्वतःच्या नातेवाईकांना पदे दिल्याचा गंभीर आरोप करत कार्यकर्त्यांनी या सणानिमित्त आपला तीव्र संताप व्यक्त केला. सोलापूर महापालिकेत १९९३ नंतर पहिल्यांदाच मराठा समाजाला महापौरपदाची संधी चालून आली होती. यंदा हे पद सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने समाजात मोठी उत्सुकता होती. मात्र, भाजपने या पदासाठी विनायक कोंड्याल यांची निवड केल्याने मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. “स्थानिक नेत्यांनी समाजाचा विचार करण्याऐवजी स्वतःच्या मर्जीतील आणि नातेवाईक असलेल्या व्यक्तींना संधी दिली,” असा आरोप समन्वयकांनी केला. मागण्या मान्य करा, अन्यथा आंदोलन मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “महापौरपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात किमान सव्वा वर्षे मराठा समाजाच्या नगरसेवकाला संधी मिळायला हवी. तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कुणबी-मराठा समाजाची वर्णी लावावी. आमच्या या न्याय्य मागण्या मान्य न झाल्यास केवळ सोलापूरच नव्हे, तर राज्यभर भाजपविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.” कोंड्याल यांची बिनविरोध निवड; भाजपचे वर्चस्व सिद्ध राजकीय रस्सीखेच आणि विरोधानंतरही सोलापूरच्या महापौरपदी भाजपचे विनायक कोंड्याल यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेचे प्रियदर्शन साठे आणि एमआयएमच्या तौफिक हतुरे यांनी शेवटच्या क्षणी आपले अर्ज मागे घेतल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी ही घोषणा केली. उपमहापौरपदी ज्ञानेश्वरी देवकर यांचीही बिनविरोध निवड झाली आहे. १०२ सदस्य संख्या असलेल्या सभागृहात ८७ नगरसेवकांसह भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने ही निवड सुकर झाली. काँग्रेसची दयनीय अवस्था, एमआयएम दुसरा मोठा पक्ष सोलापूरच्या महानगरपालिका निवडणुकीत यंदा ऐतिहासिक उलथापालथ पाहायला मिळाली. एकेकाळी या शहरावर एकहाती सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसला केवळ २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. दुसरीकडे, ८ नगरसेवकांसह एमआयएम हा सभागृहातील दुसरा मोठा पक्ष ठरला असून, विरोधी पक्षनेतेपदाची धुराही आता एमआयएमकडेच आली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात भाजपने सोलापूरवर आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले असले, तरी मराठा क्रांती मोर्चाच्या ‘काळ्या रंगपंचमी’ने सत्ताधाऱ्यांसमोर भविष्यातील आंदोलनाचे मोठे आव्हान उभे केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



