
इराण आणि इस्रायलमधील युद्धाचा परिणाम केवळ कच्च्या तेलाच्या किमतींपुरता मर्यादित न राहता, आता जगाच्या ‘अन्न सुरक्षे’लाच मोठा धोका निर्माण झाला आहे. आखाती देशांमधून होणारा खत पुरवठा खंडित झाल्यामुळे जागतिक बाजारात खतांच्या किमती गगनाला भिडल्या असून, याचा सर्वाधिक फटका भारतासारख्या कृषीप्रधान देशाला बसण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक रोखली जाण्यापेक्षाही खत पुरवठा साखळीतील व्यत्यय अधिक धोकादायक मानला जात आहे. सौदी अरेबिया, कतार, ओमान आणि युएई हे देश युरिया, सल्फर आणि अमोनियाचे जागतिक स्तरावर सर्वात मोठे पुरवठादार आहेत. विशेषतः इराण हा जगातील तिसरा मोठा अमोनिया उत्पादक देश आहे. हे युद्ध लांबल्यास या देशांमधून होणारी खत वाहतूक ठप्प होईल, ज्याचा थेट परिणाम आगामी शेती हंगामातील धान्य उत्पादनावर होणार आहे. भारताचे आयातीवर १०० टक्के अवलंबित्व्र भारत आपल्या खतांच्या गरजेसाठी मोठ्या प्रमाणावर परदेशांवर अवलंबून आहे. आकडेवारीनुसार म्युरेट ऑफ पोटॅश १०० टक्के आयात होते. डीएपी ६० टक्क्यांपर्यंत आयात होते. भारत दरमहा सुमारे २० लाख टन खते आयात करतो. गेल्या आर्थिक वर्षात (२०२४-२५) केंद्र सरकारने खत अनुदानावर १.९ लाख कोटी रुपये खर्च केले होते. मात्र, युद्धा मुळे युरियाच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्यास सरकारवरील अनुदानाचा भार प्रचंड वाढणार आहे किंवा त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. जागतिक बाजारपेठेत किमतींचा भडका युद्धाच्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आधीच हालचाली सुरू झाल्या आहेत. युरोपमध्ये अमोनियाचे दर प्रति टन ७२५ डॉलरपर्यंत पोहोचले आहेत. रशियाकडून होणारा पुरवठा मर्यादित असून, चीनने फॉस्फेट निर्यातीवर निर्बंध लादले आहेत. कतारमधील सल्फर उत्पादनही घटले आहे. या सर्व कारणांमुळे खतांचा जागतिक तुटवडा निर्माण झाला असून, शिपिंग मार्ग अस्थिर झाल्याने वाहतूक खर्चही वाढला आहे. महागाईचा नवा उच्चांक गाठणार? खतांच्या वाढत्या किमती आणि टंचाईमुळे शेतीचा खर्च वाढणार आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खतांचा वापर कमी केल्यास धान्य उत्पादनात मोठी घट होऊ शकते. बाजारात धान्याची आवक कमी झाल्यास अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडतील, ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागून महागाई नवीन पातळी गाठण्याची भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे. जर शेतकरी कमी खतांचा वापर करतील किंवा महागड्या खतांमुळे कमी उत्पन्न देणारी पिके निवडतील तर धान्य उत्पादनात घट होईल. जर कमी धान्य बाजारात पोहोचले तर अन्नधान्याच्या किमती गगनाला भिडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



