
महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक समजली जाणारी साताऱ्यातील बावधन (ता. वाई) येथील ‘बगाड यात्रा’ आज मोठ्या उत्साहात पार पडली. मात्र, यंदा या यात्रेत भक्तीचे एक अनोखे आणि ‘ग्लोबल’ रूप पाहायला मिळाले. एका भाविकाने चक्क अमेरिकन डॉलर्सची माळ भैरवनाथाच्या बगाडाला अर्पण केली असून, या आगळ्यावेगळ्या अर्पणाची चर्चा सध्या संपूर्ण राज्यभर रंगली आहे. ‘काशीनाथाच्या नावानं चांगभलं’च्या अखंड जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत आज सकाळी बगाडाची मिरवणूक काढण्यात आली. गावच्या वेशीवरील कृष्णा नदीच्या पात्रातून या बगाड यात्रेला प्रारंभ झाला. सुमारे ४०० ते ५०० वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी बावधनमध्ये गर्दी केली होती. जसे बगाड गावाकडे सरकू लागले, तसा भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता, वाई पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. बगाडावर परदेशी चलनाची माळा यंदाच्या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे बगाडाला अर्पण करण्यात आलेल्या परदेशी चलनाच्या नोटा. एका निष्ठावान भक्ताने अमेरिकन डॉलर्सची मोठी माळ बगाडाला वाहिली. एवढेच नव्हे तर, यात्रेसाठी आलेल्या काही परदेशी भक्तांनीही परदेशी चलनाच्या नोटांचे तोरण बगाडाच्या शिडावर अर्पण केले. ग्रामीण भागातील एका पारंपरिक उत्सवात असा ‘डॉलर्स’चा वर्षाव होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने परिसरात मोठे कुतूहल निर्माण झाले होते. ५०० वर्षांची जाज्वल्य परंपरा बावधनचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी ही यात्रा भरते. लाकडी रचनेच्या उंच खांबावर बगाड्याला टांगून, तो बगाड बैलांच्या साह्याने ओढत नेण्याची ही कसरत पाहताना अंगावर शहारे येतात. सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत ही परंपरा मोठ्या श्रद्धेने पार पाडण्यात आली. गेल्या ४०० ते ५०० वर्षांपासून ही बगाड यात्रा सुरू असल्याचे बावधनचे नागरिक सांगतात. परंपरेचा वारसा जपत असतानाच, आता या यात्रेची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली असल्याचे या ‘डॉलर्स’च्या माळेवरून सिद्ध होत आहे, अशा भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



