
प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन समस्यांचे निराकरण करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा‑१’ राबवण्यात येत असून अभियानाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत एकूण ७ महसुली मंडळ मुख्यालयी समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्याच दिवशी ४ हजारांपेक्षा जास्त दाखले वितरीत करण्यात आले. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले. शिबिरांमध्ये सात‑बारा, नमुना‑८, नामबदल, महसूल कर, वन‑विभागाच्या मान्यता, नाहरकत प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्र, श्रावण बाळ योजनेचा लाभ, संगायो योजना, पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड वाटप अशा अनेक महसूल आणि इतर सरकारी सेवांचा लाभ एकाच ठिकाणी प्रदान करण्यात आला. त्यामुळे शेतकरी बांधव व नागरिकांना कार्यालयात चकरा मारण्याची आता गरज राहणार नाही. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनात जिल्हाभरात या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा‑१’अभियानात समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. इतर शासकीय विभागही या अभियानामध्ये सहभागी झाले. त्यामुळे विविध दाखले, लाभ आदी मिळून प्रलंबित बाबींचे निराकरण होण्यास मदत झाली. अभियानाच्या पहिल्या दिवशी अकोला तालुक्यात दहीहंडा व घुसर , पातूर तालुक्यात आलेगाव , बाळापूर तालुक्यात उरळ , मूर्तिजापूर तालुक्यात जामठी , अकोट तालुक्यात मुंडगाव , तेल्हारा तालुक्यात पाथर्डी या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उपस्थिती मध्ये शिबिरे आयोजित केली होती . अकोट तालुक्यातील मुंडगाव व तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील समाधान शिबिरांचे उद्घाटन अकोट-तालुका विधानसभा मतदारसंघाचे आ. प्रकाश भारसाकळे यांनी केले. तर पातूर तालुक्यातील आलेगाव येथील शिबिराची सुरुवात अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



