
पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सोमवारी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी १३ हजार ९९५ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर केले. शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरी सुविधा अधिक मजबूत करण्यावर या अंदाजपत्रकात विशेष भर देण्यात आला आहे. या अंदाजपत्रकात पाणीपुरवठा विभागासाठी सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे. या विभागासाठी २०७७ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. वाढती लोकसंख्या आणि शहरातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. मलनिस्सारण प्रकल्पांसाठी १२१६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, शहरातील सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यासाठी विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. तसेच, घनकचरा व्यवस्थापनासाठी १३९० कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत, ज्यातून कचरा प्रक्रिया आणि स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले जाईल. शहरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पथ विभागाला १८६६ कोटी रुपये देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, वाहतूक नियोजन आणि इतर संबंधित प्रकल्पांसाठी ७४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रालाही महत्त्व देत प्राथमिक शिक्षण विभागासाठी ९७९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भवन रचना विभागासाठी ६५० कोटी रुपये, तर विद्युत विभागासाठी २६५ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत. सामाजिक विकासासाठी १४३.५० कोटी रुपये, उद्यान विभागासाठी २०५ कोटी रुपये आणि आरोग्य विभागासाठी ८८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नगर रचना नियोजनासाठी ६४.५० कोटी रुपये, पर्यावरण विभागासाठी ५१.५९ कोटी रुपये आणि माहिती व तंत्रज्ञान विभागासाठी ५६.७३ कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय, हेरिटेज सेलसाठी २८.५० कोटी रुपये आणि सांस्कृतिक केंद्र विभागासाठी १७१.३१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या अंदाजपत्रकातून शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



