
अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सभेमध्ये आज अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतले जाणार आहेत. यामध्ये ‘एक शहर-एक परीक्षा केंद्र’ आणि सर्व विभागप्रमुखांकडून दरमहा आढावा घेण्याबाबतच्या प्रस्तावांचा समावेश आहे. दुपारनंतर याच सभेत नव्या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्पही सादर केला जाईल. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधीसभेची (सिनेट) अर्थसंकल्पीय बैठक आज दुपारी १२ वाजता डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत चालू वर्षाचा जमाखर्च आणि नव्या वर्षाचा अंदाज व्यक्त करणारा अर्थसंकल्प सादर केला जाईल. या सभेत प्रा. डॉ. रवींद्र मुंदे यांनी ‘एक शहर-एक परीक्षा केंद्र’ असा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, अमरावतीसह विभागातील इतर मोठी शहरे वगळता इतर ठिकाणी ‘एक शहर-एक परीक्षा केंद्र’ ही संकल्पना लागू केली जाईल. दुसरे सिनेटर गिरीश शेरेकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभागाच्या धर्तीवर विद्यापीठानेही आपल्या सर्व विभागप्रमुखांची मासिक बैठक घेऊन सर्व विभागांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, असा प्रस्ताव सादर केला आहे. अन्य एक सिनेट सदस्य तथा प्रसिद्ध सीए संकेत सावजी यांनीही एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावानुसार, परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थ्याच्या पालकाचे निधन झाल्यास, अशा विद्यार्थ्यांना घटनेच्या महिनाभरानंतर परीक्षेची स्वतंत्र संधी देण्यात यावी. सध्या अशी सवलत विद्यापीठाच्यावतीने वेगवेगळ्या पातळ्यांवर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू व कलावंतांना दिली जाते. सिनेटर प्रा. कैलास चव्हाण यांनी शहीद दिनानिमित्त (२३ मार्च) व्याख्यानमाला आयोजित केली जावी, असा प्रस्ताव दाखल केला आहे. २३ मार्च रोजी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना फाशी देण्यात आली होती. त्या घटनेची आठवण अधिक ताजी राहावी यासाठी अमरावती विद्यापीठातही शहीद स्मृती व्याख्यानमाला व्हावी, असे या प्रस्तावाचे म्हणणे आहे. विद्यापीठाचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प अधीसभा तथा व्यवस्थापन परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अविनाश बोर्डे यांच्याद्वारे मांडला जाईल. तसेच, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि परिसंस्थांच्या वर्षभरातील कामगिरीचा वार्षिक अहवाल व्यवस्थापन परिषदेचे दुसरे सदस्य प्रा. डॉ. व्ही. एच. नागरे सादर करतील. या दोन्ही दस्तऐवजांची मांडणी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यापूर्वीच झाली असून, आजच्या अधीसभेत ते अंतिमतः मंजूर केले जातील.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



