
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा २०२४-२५ या वर्षासाठीचा अर्थसंकल्प बुधवार, ११ मार्च रोजी सिनेट सभेत सादर करण्यात आला. व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. अविनाश बोर्डे यांनी हा अर्थसंकल्प मांडला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थसंकल्पात विद्यापीठाचे उत्पन्न ३१४.१४ कोटी रुपये तर खर्च ३९०.१६ कोटी रुपये अपेक्षित आहे, ज्यामुळे ७६ कोटी २ लाख रुपयांची तूट दर्शविली आहे. कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला प्र-कुलगुरु डॉ. महेंद्र ढोरे आणि कुलसचिव डॉ. अविनाश असनारे उपस्थित होते. सभेमध्ये प्रश्नोत्तरे, प्रस्ताव आणि अर्थसंकल्पाचे सादरीकरण या बाबी पूर्णत्वास गेल्या. विद्यार्थ्यांसाठी अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक संशोधनासाठी टाटा, बार्टी, महाज्योती यांसारख्या संस्थांकडून फेलोशिप न मिळालेल्या विद्यार्थ्यांना अमरावती विद्यापीठातर्फे फेलोशिप दिली जाईल. उत्तरपत्रिकांच्या तपासणीसाठी ऑनलाईन डिजिटल पद्धत (एक्झामिनेशन रिफॉर्म्स) वापरून निकाल अधिक पारदर्शक व वेळेत लावण्यासाठी ११ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. ‘अवार्ड ऑफ व्हीसी फेलोशिप’साठी ५ लाख रुपये, तर प्रशिक्षण, कौशल्य विकास आणि व्यावसायिक ज्ञानासाठी ८८.२५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्ञानस्रोत केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी मिळाव्यात यासाठी २ कोटी १९ लाख ४५ हजार रुपयांची भरीव तरतूद आहे. विद्यार्थी हिताबरोबरच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीही विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. आगामी वर्षात शिक्षक व कर्मचारी कल्याण निधीच्या माध्यमातून ६६ लाख ५७ हजार रुपये खर्च केले जातील. विद्यापीठाच्या सर्व शैक्षणिक विभागांसाठी एकूण ५ कोटी ३९ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांसाठी ई-गव्हर्नन्स आणि दस्तऐवजांचे डिजिटायझेशन यावर विद्यापीठ ८६ लाख ५० हजार रुपये खर्च करणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



