
साधुसंत हे भगवंताजवळ जगाच्या कल्याणाची सदा याचना करत असतात. अगदी भगवंत प्रसन्न झाल्यावरही ते सत्संगाची कामना करत असतात. सत्संग भक्त व संतांना प्रिय आहे, त्याच पद्धतीने तो भगवंतालाही अत्याधिक प्रिय आहे. सत्संगाने जीवनाची इतिश्री होते. इच्छा तृप्त होतात. कोणतीही इच्छा शिल्लक राहत नाही. म्हणून अशा सत्संगाची कामना भक्ताने करून जीवनाच्या इतिश्रीचा मार्ग सुकर करावा, असा उपदेश चैतन्य महाराज देगलूरकर यांनी केला. श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज बिजोत्सव सेवा समिती, गायत्री नगर कौलखेड यांच्या वतीने गायत्री नगरच्या प्रांगणात प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात पंढरपूर येथील कीर्तनकार चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सातवे पुष्प सादर केले. “देव वसे चित्तीं । त्याची घडावी संगती ॥१॥ ऐसें आवडते मना । देवा पुरवावी वासना,हरीजनासी भेटी,नहो अंगसंगें तुटी, तुका म्हणे जिणें, भलें संतसंघष्टणें…’ या तुकोबांच्या अभंगावर कीर्तन सादर केले. देगलूरकर महाराज यांनी संत श्रेष्ठ तुकोबांच्या पांडुरंग भेटीची कथा सादर केली. चित्त मोकळे असेल तर त्यात भगवंत नक्कीच वास करतात. किंबहुना भगवंत हे भक्ताचे दास बनून त्यांच्या चाकरीस स्वतः हजर राहतात. देहूवरून एकादशीला वारी करत तुकोबा पंढरपूरला आले. मंदिरात दर्शनासाठी बारीमध्ये उभे राहिले. ज्याच्या दर्शनाकरिता आपण देहूवरून मंदिरात आलो, अशा विठुरायाला बघण्याचा त्यांना आनंद झाला. विठोबाचे दर्शन हे जन्माचे सार्थक झाले असल्याचे त्यांना वाटले. भगवंतांना बघण्याची इच्छा आज पूर्ण होत असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. त्यांनी भगवंताच्या पायावर आपले मस्तक टेकवले. तुकोबांचा हा अत्यानंद बघून भगवंताला अत्यानंद झाला. तुकोबांना जेवढा आनंद झाला त्याच्या दुप्पट भगवंताला अत्यानंद झाला. अठ्ठावीस युगे मी जिथे उभा आहे आज आपला भक्त आपल्या जवळ आला हे बघून भगवंत तुकोबांच्या पुढ्यात उभे राहिले. भगवंत म्हणाले, आज मला एक इच्छा निर्माण झाली आहे, ती इच्छा म्हणजे तुम्ही काही मागावे. तेव्हा तुकोबा म्हणाले, मी मागण्यासाठी आलेलो नाही. आपले दर्शन झाले. मी धन्य झालो, विठूरायाने अनेक प्रकारे तुकोबांना काहीतरी मागण्याच्या सूचना केल्यात, विनवण्या, प्रार्थना केल्यात. मात्र, तुकोबाने गाथेचे संदर्भ भगवंताला देत मागणे नाकारले. जेव्हा भगवंताने याचे पुन्हा पुन्हा कारण विचारले, तर तुकोबाने वारी ही पूर्वजापासून सुरू असून पूर्वजांची भगवंताला काहीच न मागण्याची परंपरा आम्ही पुढे ठेवत असल्याचे निदर्शनास आणले. जगाच्या उद्धारासाठी सत्संगाची कामना विठुरायांनी विटेवरून खाली उतरून आपले उपरणे तुकोबासमोर पसरून डोळ्यातून अश्रू ढाळत प्रार्थना केली. तुकोबांचे मन गहिवरून आले, डोळ्यातून अश्रू वाहू लागले, त्यांनी भगवंताला उठवले व इच्छा नसतानाही मागणे मागितले. विठोबाने भगवंताजवळ सत्संग देण्याची कामना केली. सर्व मिळाले पण सत्संग नाही मिळाला तर जीवन व्यर्थ आहे. म्हणूनच तुकोबांनी जगाच्या उद्धारासाठी सत्संगाची कामना करून मानवी जीवनावर उपकार केले, असे चैतन्य महाराज देगलूरकर यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



