
मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नव्या कोऱ्या गाडीवर लावलेले लाल व निळ्या रंगाचे फ्लॅश लाईट्स सध्या चर्चेचा विषय ठरलेत. सरकारी वाहनांवर कोणत्याही प्रकारचे विशेष दिवे किंवा अधिकार दर्शवणारी चिन्हे लावण्यास मनाई असताना, त्यांच्या गाडीवर असे दिवे लावल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे हेच फ्लॅश लाईट्स आता महापौरांसाठी वादाचे व डोकेदुखीचे कारण ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती. व्हीआयपी संस्कृतीला आळा घालण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर देशभरातील बहुतांश सरकारी वाहनांवरील लाल दिव्यांचा वापर बंद करण्यात आला. मात्र आता मुंबईच्या महापौरांच्या नव्या गाडीवर समोर लाल-निळे फ्लॅश दिवे बसवण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या वाहनांप्रमाणे हे दिवे दिवसा देखील लावले जात असल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुंबईचा शिवसैनिक नामक एका एक्स पेजवरून रितू तावडे यांच्या गाडीचा एक फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यात त्यांच्या कारच्या दर्शनी भागात फ्रंट गिललगत लाल व निळे फ्लॅश लाईट्स लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबई महापौर यांच्या वाहनाला पोलिसांसारखे लाल-निळे दिवे लावण्याचा परवाना आहे काय? असा तिखट सवालही या पोस्टमध्ये उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी महापौरांनी शहरात व्हीआयपी संस्कृती पुन्हा सुरू केल्याची टीका केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनीही या प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. नवनिर्वाचित महापौरांच्या विरोधात नक्की काय चाललंय? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. अधिकाऱ्यांची दिवे काढून टाकल्याची पुष्टी दुसरीकडे, या प्रकरणी टीकेची झोड उठताच पालिका अधिकाऱ्यांनी हे दिवे दोन दिवसांपूर्वीच काढून टाकण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. महापौरांच्या गाडीवर लाल-निळे दिवे लावण्यात आले होते. पण नियमांचे पालन करत हे दिवे दोन दिवसांपूर्वीच काढण्यात आलेत. सध्या महापौरांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. आता पाहू काय आहे सरकारचा नियम? केंद्र सरकारच्या 1 मे 2027 च्या अधिसूचनेनुसार, फक्त अग्निशमन, पोलिस, संरक्षण दल व अर्धसैनिक दल व आपत्ती व्यवस्थापन सेवांच्या वाहनांनाच विशेष परिस्थितीत रंगीत दिवे लावण्याची परवानगी आहे. सामान्य सरकारी वाहनांवर असे दिवे, नामफलक किंवा ध्वज लावणे बेकायदा आहे. त्यामुळे अधिकृत काम नसताना असे दिवे लावणे नियमांचे उल्लंघन मानले जाते. या नियमाद्वारे व्हीआयपी संस्कृतीला आळा घातल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक झाले होते. पण आता मुंबईच्या महापौरांच्या गाडीवरच लाल-निळे दिवे आढळल्यामुळे भाजपवर आपल्याच सरकारच्या नियमांना हरताळ फासल्याचा आरोप होत आहे. रितू तावडे यापूर्वी घड्याळाने चर्चेत उल्लेखनीय बाब म्हणजे मुंबईच्या महापौर रितू तावडे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांच्या घड्याळामुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यांचे रोलेक्स डेटोना हे घड्याळ तब्बल 60 ते 70 लाख रुपये किंमतीचे असून, त्याची भारतातील किंमत 1 कोटींहून अधिकची असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला होता. या दाव्यानंतर सोशल मीडियात त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. पण त्यानंतर त्यांनी हे घड्याळ रोलेक्स डेटोनाचे नसल्याचे स्पष्ट करत आपल्यावरील टीका फेटाळून लावली होती. सोशल मीडियावरील माझ्या घड्याळाविषयी करण्यात येणारे दावे पूर्णतः खोटे व दिशाभूल करणारे आहेत. माझ्या हातातील घड्याळ मायकल कोर्स कंपनीचे आहे. ते रोलेक्स डेटोनाचे नाही. त्यामुळे लाखो कोट्यवधींचा प्रश्नच उद्धभवत नाही. या प्रकरणी काहीजण अफवा पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अशा खोट्या आरोपांना भीक घालत नाही, असे त्या म्हणाल्या होत्या.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



