
केंद्रीय निवडणूक आयोगाने तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुदूचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले असून, तामिळनाडू, आसाम, केरळ व पुदूचेरीमध्ये एकाच टप्प्यात, तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकांसोबतच देशातील विविध राज्यांमधील 8 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या दोन महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, या दोन्ही जागांसाठी 23 एप्रिल रोजी मतदान आणि 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे आणि बारामतीचे आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातातील निधनामुळे रिक्त झालेल्या या दोन्ही जागांसाठी आता पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघांतील लोकप्रतिनिधींच्या अकाली एक्झिटमुळे या जागा रिक्त झाल्या होत्या, ज्यावर आता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, या निवडणुकीची अधिकृत अधिसूचना 30 मार्च 2026 रोजी जारी केली जाईल, तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 6 एप्रिल 2026 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 7 एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाईल आणि अर्ज मागे घेण्यासाठी 9 एप्रिल ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया 23 एप्रिल 2026 रोजी पार पडणार असून, 4 मे रोजी मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल स्पष्ट होईल. तसेच ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बारामतीत सुनेत्रा पवार लढणार बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित केली असून, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या निवडणुकीत आपला उमेदवार रिंगणात उतरवणार नसल्याची माहिती समोर येत असल्याने, बारामतीची ही जागा बिनविरोध होणार की अन्य कोणी अपक्ष किंवा इतर पक्षाचा उमेदवार आव्हान देणार, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राहुरीत महाविकास आघाडी ताकदीने लढणार भाजपचे राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे 17 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी आता पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून, महाविकास आघाडी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे चिन्हे आहेत. या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपला उमेदवार देण्याची दाट शक्यता असून, माजी आमदार पराजक्त तनपुरे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजपकडून कोणाला संधी दिली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, कारण दिवंगत आमदारांचे पुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



