
विधिमंडळाच्या अधिवेशनात सोशल मीडियावरील बदनामीकारक मजकुरावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. “फडणवीसांनी अधिवेशनात तत्त्वज्ञान झाडताना ‘कंसात’ हे देखील स्पष्ट करावे की, ही कारवाई फक्त भाजपची बदनामी झाल्यावरच होणार का?” असा बोचरा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधानसभेत बोलताना सोशल मीडियाद्वारे कोणत्याही पुराव्याविना होणारी बदनामी टाळण्यासाठी पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. सोशल मीडियाचा वापर करून कोणत्याही पुराव्याविना बदनामी करणे हे खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्याचा सामना करावा लागतो. महिलांना तर विशेषतः करावा लागतो. यासंदर्भात कायद्यात काही तरतूद करता येईल का? हे पडताळून पाहण्यासाठी राज्याच्या पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली जाईल. त्यांच्या शिफारशीनुसार, पुढील कारवाई केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले. आता याच मुद्द्यावरून सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. सुषमा अंधारेंची सोशल मीडिया पोस्ट काय? सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत बॉलिवूड चित्रपट ‘लुटेरे’ पोस्टर असून, त्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, उद्धव ठाकरे, शरद पवार, आदित्य ठाकरे, अनिल देशमुख, संजय राऊत यांचे फोटो एडिट करून लावले आहेत. या फोटोवर ‘महाराष्ट्र के लुटेरे’ असे नाव दिले असून, दिग्दर्शन उद्धव ठाकरे आणि संगीत शरद पवार असे एडिट केलेले आहे. ‘दुजाभावा’च्या भूमिकेवर अंधारेंचा निशाणा सुषमा अंधारे यांनी लिहिले, सो कॉल्ड मुख्यमंत्री फडणवीस हे अधिवेशनात तत्त्वज्ञान झाडत असताना म्हणाले की, सोशल मीडियावर कुणीही बदनामीकारक मजकूर लिहिल्यास त्यावर कायदेशीर कारवाई होईल. पण फडणवीसांनी कंसात हे लिहिले पाहिजे की फक्त आणि फक्त भाजपाची बदनामी झाल्यावरच आम्ही कारवाई करू इतरांच्या कारवाईचा आम्ही आनंद घेऊ. विकृत संस्कारांची पिलावळ आवरून दाखवा सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांकडून होणाऱ्या ट्रोलिंगवर अंधारे यांनी अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्या म्हणाल्या, “जर खरंच कारवाई करण्याची हिंमत तुमच्यात असेल, तर सोशल मीडियावर वावरणारी भाजपची ही ‘विकृत संस्कारांची पिलावळ’ रोखून दाखवा. अशा पद्धतीने आपल्या आई-वडिलांचे आणि भाजपचे संस्कार दाखवणाऱ्यांना आवर घालण्याची हिंमत शासन दाखवणार का?” असे आव्हान सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



