
अजित पवारांसारख्या राज्यातील एका प्रमुख नेत्याच्या संशयास्पद अपघाती मृत्यूवर विधिमंडळात चर्चा करू दिली जात नाही. याचा अर्थ काय? यावरून या अपघातामागे एक मोठी शक्ती असल्याच्या आमच्या संशयाची एकप्रकारे पुष्टीच झाली आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राज्यात या अपघातामागील ‘ती मोठी शक्ती कोण?’ असा प्रश्न विचारला जात आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी बारामती येथील एका विमान अपघातात मृत्यू झाला होता. तेव्हापासून हा अपघात नव्हे तर घातपात असल्याचा आरोप केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या नेत्यांनी वारंवार हा मुद्दा उपस्थित केला आहे. विशेषतः आमदार रोहित पवार व अमोल मिटकरी यांनी हा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करून त्यावर चर्चा करण्याची मागणी केली होती. रोहित पवार यांनी मंगळवारीच या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या मुद्यावर विधिमंडळाच्या पटलावर चर्चा करण्याची मागणी केली होती. पण राहुल नार्वेकर यांनी आज सभागृहात यासंबंधी मांडलेला स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला. काय म्हणाले रोहित पवार? रोहित पवार यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला. ते एका पोस्टद्वारे म्हणाले, अजितदादांसारख्या राज्यातील एका प्रमुख नेत्याचा विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्यांच्या या अपघातावर विधिमंडळात चर्चाही करु दिली जात नाही. याबाबत विस्तृत चर्चेची मागणी कालच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब यांच्याकडं केली होती. आज हा स्थगन प्रस्ताव स्वीकारून अजितदादांच्या अपघातावर विस्तृत चर्चा होईल अशी अपेक्षा होती. पण अध्यक्षांनी हा स्थगन प्रस्ताव नाकारला आणि विधानसभेत इतर विषयांवर बोलण्याची अनुमती दिली. या ज्वलंत विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला असता बोलूही दिलं गेलं नाही, याचा अर्थ काय? यावरुन या अपघातामागे नक्कीच कोणती तरी एखादी मोठी शक्ती असल्याचा आमचा संशय असून या निर्णयामुळं आमच्या संशयाला एकप्रकारे पुष्टीच मिळत आहे. सरकारने अजितदादांच्या अपघाताच्या विषयाला कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही मात्र हा विषय सोडणार नाही… अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करतच राहू, असे त्यांनी म्हटले आहे. आमचा आवाज दाबला जात आहे रोहित पवार यांनी या प्रकरणी पत्रकारांशीही संवाद साधला. त्यातही त्यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, आमचा आवाज दाबला जात आहे. अजितदादांविषयी आम्ही जेव्हा केव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आम्हाला बोलू दिले जात नाही. त्यावरून आपल्याला समजून घ्यावे लागेल की, सत्तेतल्या लोकांनाच यावर चर्चा करायची नाही. हा अपघात का घातपात? यावर चर्चा होऊ दिली जात नसेल तर सत्ताधाऱ्यांपैकीच कुणीतरी एक असा व्यक्ती आहे जो दादांच्या अपघाताला जबाबदार असू शकतो. या व्यक्तीचे नाव बाहेर येऊ नये, त्याबद्दलची चर्चा होऊ नये, यासाठीच आम्हाला एफआयआर करू दिला जात नाही. आम्हाला चर्चाही करू देत नाही. या प्रकरणी सीबीआयकडे अजून प्रस्ताव पाठवला गेला नाही. पण सत्ताधाऱ्यांपैकी एक पक्ष (राष्ट्रवादी) स्मरणपत्रावर स्मरणपत्र पाठवत आहे. अजित पवारांसारख्या मोठ्या नेत्याला न्याय देता नसेल, तर सर्वसामान्य जनतेचे काय? असा सवाल रोहित पवार यांनी या प्रकरणी उपस्थित केला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



