
महाराष्ट्रात सध्या हवामानाचे दोन टोकाचे चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला काही भागात उन्हाची तीव्रता वाढत असताना, दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने या भागांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बदलत्या वातावरणामुळे शेतकरी आणि नागरिक दोघांनाही सावधगिरी बाळगावी लागणार आहे. विदर्भात दुपारनंतर हवामान अधिक सक्रिय होणार असल्याचा अंदाज आहे. विशेषतः नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा, अकोला, चंद्रपूर आणि भंडारा या भागांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम येथेही काही ठिकाणी विजांसह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ताशी 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, तेथेही विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या बदलत्या हवामानामुळे शेतीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर आणि अहिल्यानगर या भागांतही काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. मात्र, कोकण किनारपट्टीवर चित्र वेगळे असून पुढील दोन दिवसांत तापमानात वाढ होऊन उकाडा जाणवणार आहे. दरम्यान, दुपारनंतर पावसाची शक्यता लक्षात घेता काढणीला आलेली पिके सुरक्षित ठिकाणी हलवण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने झाडाखाली किंवा पत्र्याच्या शेडखाली उभे राहणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. हवामानातील या अचानक बदलामुळे नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



