
एरवी साबणाचे बुडबुडे हा लहान मुलांचा मनोरंजनाचा खेळ म्हणून आपण सहज हवेत उडवून सोडून देतो. पण त्यालाही गणितीय परिमाणे असतात. महाराष्ट्राचे क्रियाशील संशोधक असलेले डॉ. अजिंक्य कोत्तावार यांनी साबणाच्या बुडबुड्यांना त्रिमितीय (३-डी) आणि विविध भौमितिक आकार देण्याचा अद्भुत शोध लावला. विशेष म्हणजे त्याचे पेटेंट त्यांनी आपल्या तीन वर्षीय चिमुकल्या कन्येच्या नावे नोंदवले. त्यामुळे त्यांची कन्या गोजिरी अजिंक्य कोत्तावार ही जगातील सर्वात लहान वयाची आंतरराष्ट्रीय पेटंटधारक बनली आहे. गोजिरी एकेदिवशी साबणाचे बुडबुडे हवेत उडवत असताना वडिलांनी बघितले. सहसा ते गोल आकाराचे असतात. मात्र तिच्या वडिलांनी संशोधक दृष्टीने लक्ष देऊन त्यात आकार शोधले. नंतर या संशोधनाचे पेटंट त्यांनी आपली मुलगी गोजिरीच्या नावे नोंदवले. या नावीन्यपूर्ण संशोधनासाठी जर्मनी सरकारकडून २० नोव्हेंबर २०२५ रोजी तिला अधिकृत पेटंट प्रदान करण्यात आले. त्याची “ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड्स’ने देखील जागतिक विक्रम म्हणून नोंद घेतली आहे. डॉ. अजिंक्य कोत्तावार हे स्वतः नामवंत संशोधक आहेत. त्यांच्या नावावर तब्बल ४८ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पेटंट्स आहेत. शिक्षण आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या कार्यामुळे “पद्मश्री’ पुरस्कारासाठी देखील त्यांचे नामांकन झाले आहे. यवतमाळ येथे त्यांनी ‘ऊबुंटू’ नावाची प्रयोगशील शाळा सुरू केली असून तिथे मुलांना ‘प्रयोगातून शिक्षण’ दिले जाते. बुडबुडे गोल नाही, त्रिकोणी, चौकोनी आकार धारण करतात लहान मुलांना साबणाचे बुडबुडे उडवायला खूप आवडतात. मात्र, सहसा हे बुडबुडे गोल आकाराचेच असतात. गोजिरीच्या या संशोधनामुळे या बुडबुड्यांना थ्रीडी स्वरूप प्राप्त झाले आहे. या संशोधनात एक खास आकाराचा बेस तयार करण्यात आला. या बेसच्या साहाय्याने हवेत बुडबुडे सोडल्यास ते गोल न राहता विज्ञानातील थ्रीडी आकार धारण करतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



