digital products downloads

कमी दृश्यमानता असताना लँडिंगचा हट्ट का?: अजितदादांच्या अपघाताबद्दल विधानसभेत बोलताना चेतन तुपे रडले, तपासाच्या संथ गतीवरून संताप – Mumbai News

कमी दृश्यमानता असताना लँडिंगचा हट्ट का?:  अजितदादांच्या अपघाताबद्दल विधानसभेत बोलताना चेतन तुपे रडले, तपासाच्या संथ गतीवरून संताप – Mumbai News



“२८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस होता, ज्या दिवशी राज्याचा दैदिप्यमान तारा निखळला. पण आज दोन महिने उलटूनही आपल्या लाडक्या नेत्याच्या मृत्यूचे सत्य समोर का येत नाही?” असा आर्त सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांना आज विधानसभेच्या सभागृहात रडू कोसळले. २९३ च्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान तुपे यांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून सरकार आणि संबंधित ‘व्हीएसआर’ कंपनीला अक्षरशः धारेवर धरले. “जोपर्यंत दादांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. चेतन तुपे म्हणाले, २८ जानेवारी २०२६ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय काळाकुट्ट दिवस. ही तारीख महाराष्ट्रातील १४ कोटी जनता विसरू शकणार नाही. त्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातील दैदिप्यमान तारा क्षितीजावरून निखळला. आपल्यातून आपले सर्वांचे आणि महाराष्ट्राचे लाडके अजितदादा आपल्याला सोडून निघून गेले. हे दु:ख राज्यातील १४ कोटी जनतेला आहे. चेतन तुपे म्हणाले, आमच्या राष्ट्रवादीच्या सगळ्या आमदारांच्या आणि महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेच्या मनात काही प्रश्न आहेत. आम्ही सर्वांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले, चौकशीची मागणी केली. सरकार याबद्दल अतिशय समक्षपणे आणि समर्थपणे सगळी चौकशी करतील, अशी आमच्या मनात पूर्ण खात्री आहे. पण महाराष्ट्रातील १४ जनतेच्या मनात जे प्रश्न आहेत, त्याला वाचा फुटली पाहिजे. कमी दृश्यमानता असताना लँडिंगचा हट्ट का? चेतन तुपे म्हणाले, हा अपघात का घडला? याबाबत वारंवार आणि अनेक अहवालात सांगितले की, दृष्यमानता कमी होती. मग अत्यंत कमी दृष्यमानता असताना विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला गेला? महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री विमानात बसलेला असताना ते विमान वळवून दुसऱ्या विमानतळाकडे का नेण्यात आले नाही? थोडावेळ थांबवण्यात का आले नाही? हे प्रश्न आमच्यासारख्याला पडलेत. विमान लँडिंग करण्यासाठी व्हीएसआर कंपनीकडून पायलटवर कुणाचा दबाव होता का? असुरक्षित परिस्थिती असताना विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न का केला गेला? हा खरा प्रश्न आहे. याचीही चौकशी झाली पाहिजे. याची उत्तरे मिळाली पाहिजे. याची उत्तरे जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनाला शांती लाभणार नाही. विमानात अतिरिक्त इंधन भरले होते का? चेतन तुपे म्हणाले, सांगताना असे सांगण्यात आले की, विमानाचा ॲप्रोज एका दिशेने होता. विमान रनवेपासून विचलित झाले. काही लँडिंग होताना झाडाला धडकले गेले. रनवेच्या डाव्या बाजुला जाऊन ते कोसळले आणि त्यानंतर विमानात आग लागली. मात्र यानिमित्तानेही काही प्रश्न आहेत. विमान मुंबईवरून बारामतीला जात होते, त्यासाठी जेवढे इंधन पाहिजे, तेवढे होते की त्यापेक्षा अतिरिक्त भरले होते. अतिरिक्त इंधन भरले असेल, तर विमान डायव्हर्ट का केले नाही? उतरवायचाच प्रयत्न का केला? विमानात नक्की किती इंधन होते? अतिरिक्त असेल तर ते का होते? अतिरिक्त इंधन असताना सुद्धा लँडिंग तिथेच करायचा हट्ट का केला गेला? पुढच्या एअरपोर्टकडे का नाही गेले? हे सगळे आम्हाला समजले पाहिजे. विमानाच्या उड्डाणाची सुरक्षा तपासणी झाली होती का? चेतन तुपे म्हणाले, विमान मुंबईकडून बारामतीकडे उड्डाण करणार होते, त्यावेळी या विमानाच्या उड्डाणाची सुरक्षा तपासणी झाली होती का? झाली असेल तर व्यवस्थित झाली होती का? ती कोणी केली होती? त्याचा अहवाल कुठे आहे? त्याचे सत्यही समोर आले पाहिजे. हे सगळे आम्हाला समजले पाहिजे. त्या उड्डाणाला पात्र ठरवणारा एअरक्राफ्ट्स मेन्टेनन्स इंजिनिअर कोण होता? त्याचे नाव काय? विमान उड्डाणासाठी योग्य आहे हे ज्या व्यक्तीने क्लिअर केले त्याचे नाव समोर का येत नाही? विमान तेच होते की शेवटच्या क्षणी बदलले? कुठल्या विमानाला क्लिअरन्स दिला होता? कुठल्या विमानाची तपासणी झाली होती? या सगळ्या गोष्टी आमच्या मनात शंका निर्माण करत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे डिटेल अहवाल समोर आले पाहिजेत आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पायलट बदलण्याचे ‘ते’ संशयास्पद कारण चेतन तुपे म्हणाले, नियोजित विमानेच जे पायलट होते, ते असे कुठल्या ट्रॅफिक जॅममध्ये अडकले होते की त्यांना बदलावे लागले? शेवटच्या क्षणी क्रू का बदलला गेला? हा कुणाच्या आदेशाने बदलला गेला? कंपनीच्या कोणत्या माणसाने क्रू बदलण्याचे आदेश दिले? या सगळ्याची शहानिशा झालीच पाहिजे आणि या सगळ्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. कारण सकाळी सहा वाजता वाहतूक कोंडीत पायलट अडकले आणि त्यामुळे नवीन पायलट आणि क्रू बदलण्यात आला. हेच मुळी संशयास्पद वाटतंय. सकाळी सहा वाजता कुणीही ट्रॅफिकमध्ये अडकत नाही. अडकला जरी, तरी तो एखादा मिनिट सिग्नलला अडकतो. सकाळी सहा वाजता अर्धा अर्धा तास कुणी अडकतो का? सकाळी सहा वाजता कोणते ट्रॅफिक सिग्नल चालू असतात? त्यामुळे अतिशय मोठी संशयाची सूई त्या दिशेने फिरते की, हे पायलट का बदलण्यात आले? याचे उत्तर आम्हाला मिळालेच पाहिजे. माझा कटाक्ष कुणावर नाही, तर व्हीएसआर कंपनीवर आहे. कारण क्रू बदलण्याचा निर्णय कंपनीचा होता. तो का घेण्यात आला? त्यासाठी ट्रॅफिकमध्ये अडकण्याचे संशयास्पद कारण का दिले? हा माझा मुख्य प्रश्न आहे. मेन्टेनन्स इंजिनिअरचे नाव गुलदस्त्यात का? चेतन तुपे म्हणाले, डीएफडीआर आणि सीव्हीआर यांच्या डीकोडिंगबद्दल अद्ययावत माहिती काय आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर आली पाहिजे. व्हीएसआर कंपनीची दोन-चार विमाने थांबवली. संपूर्ण विमानांची चौकशी का झाली नाही? कारण अनेक ठिकाणी लक्षात आले की, कंपनीच्या विमानांचे उड्डाणाचे तास भरून गेले होते. पण त्याचा मेन्टेनन्स होत नव्हता. या सगळ्याची चौकशी का झाली नाही? प्रत्येक विमानाची बारकाईने तपासणी का झाली नाही? काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील याच कंपनीचे विमान वापरले होते. त्याआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना याच कंपनीचे विमान वापरत होते. मोठ्या व्यक्ती यांच्या विमानातून प्रवास करत असतात, तरी सुद्धा यांच्याकडे मेन्टेनन्समध्ये एवढी दिरंगाई आणि हलगर्जी होत असेल, तर यांच्यावर कारवाया का होत नाहीत? विमानात इंधनाव्यतिरिक्त आणखी कोणता माल भरला होता? चेतन तुपे म्हणाले, विमानात स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात आणि आपण सगळ्यांनीही टीव्ही चॅनलला विमानात अनेक स्फोट झाल्याचे बघितले. मग त्या विमानात इंधनाव्यतिरिक्त इतर अज्ञात असा माल किंवा कार्गो भरला होता का, ज्यामुळे स्फोट झाले? यासंदर्भात कोण आणि कधी खुलासा करणार? जे पायलट वाहतूक कोंडीत अडकले होते, त्यांच्या नार्को टेस्ट करा. महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर कधी मिळणार? ही चौकशी तडीला लावली पाहिजे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजे. जोपर्यंत आमच्यासमोर सत्य येत नाही, तोपर्यंत आम्ही कुणी थांबणार नाही.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp