
तीन महिन्याचे वेतन देयक तयार करून अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेतल्याचा मोबदला म्हणून एक हजार रुपयाची लाच घेताना पूर्ण पाटबंधारे विभाग वसमत येथील वरिष्ठ लिपिकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी 23 सायंकाळी रंगेहात पकडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्ण पाटबंधारे विभागाच्या सिंचन व्यवस्थापन विभागातील एका कर्मचाऱ्याचे जुलै ऑगस्ट व सप्टेंबर 2025 या कालावधीत असलेले वेतन देयक थकीत होते. सदर वेतन देयक देण्यासाठी त्यांनी पूर्णा पाटबंधारे विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार पाटबंधारे विभागातील वरिष्ठ लिपिक सलीम अब्दुल अहमद शेख याने त्यांची वेतन देयक तयार करून त्यावर उपकार्यकारी अभियंत्यांची स्वाक्षरी घेतली होती. तसेच सदर देयक कोषागार कार्यालयात सादर करण्यात आले होते. या कामाचा मोबदला म्हणून वरिष्ठ लिपिक सलीम शेख याने एक हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यावरून संबंधित कर्मचाऱ्याने हिंगोली येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची आज दुपारी पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली होती. यामध्ये सलीम शेख यांने एक हजार रुपयांची लाच मागितल्याचे स्पष्ट झाले होते त्यावरून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक विकास घनवट पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, सुलभा राऊत, जमादार भगवान मंडलिक, रवींद्र वरणे, सय्यद युनूस, शेख अकबर, राजाराम फुफाटे, गजानन पवार यांच्या पथकाने वसमत येथील पूर्ण पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात सायंकाळी सापळा रचला होता ठरल्याप्रमाणे सायंकाळी वरिष्ठ लिपिक सलीम शेख याने एक हजार रुपये लाच घेताच पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले. याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



