
अमरावती शहरात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे निर्माण झालेल्या समस्येवर आमदार सुलभाताई संजय खोडके यांनी आज विधानसभेत लक्ष वेधले. त्यांनी तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली. शहराच्या वडाळी, मंगलधाम कॉलनी, एसआरपीएफ कॅम्प आणि जुना बायपास या भागांमध्ये बिबट्याच्या वारंवार दिसण्याच्या घटना समोर येत आहेत. वडाळी वनपरिक्षेत्र आणि पोहरा जंगल शहरालगत असल्याने बिबट्याचा अधिवास या भागात आहे. अन्न आणि पाण्याच्या शोधात बिबट्या शहराकडे येत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही पाळीव जनावरांवरही बिबट्याने हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मंगलधाम परिसरातील नागरिक सायंकाळी ६ नंतर घराबाहेर पडणे टाळत असून, रिक्षा मिळणेही कठीण झाले आहे. आमदार खोडके यांनी विधानसभेत, यावर कोणती कार्यवाही आणि उपाययोजना करण्यात आल्या आहेत, तसेच वनविभागाला दिशा-निर्देश दिले आहेत का, असे प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पोलीस यंत्रणेला सोबत घेऊन प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात वन विभागाला निर्देश देणार असल्याचे स्पष्ट केले. दोन वर्षांपूर्वीही एका बिबट्याने व्हीएमव्ही परिसर, पुंडलिकबाबा नगर आणि पाठपुस्तक मंडळापर्यंत शिरकाव करून धुमाकूळ घातला होता. त्यावेळीही आमदार सुलभाताई खोडके यांनी सभागृहाला या घटनेची माहिती देऊन वनमंत्र्यांचे लक्ष वेधले होते. त्यानंतर त्या बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



