
हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथे नळ पाणी पुरवठा योजनेसाठी तब्बल १.३३ कोटी रुपयांचा निधी खर्च करूनही गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती सुरु असून गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी महिलांनी बुधवारी ता. १ जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला. यापुढील काळात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथे जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे काम मंजूर करण्यात आले आहे. याकामांसाठी १.७९ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला मंजूरी देऊन कामांना सुरवात करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात काम सुरु असतांना एकही अधिकारी कामांची पाहणी करण्यासाठी आला नाही. त्यामुळे कंत्राटदाराने अंदाजपत्रकानुसार नळ पाणी पुरवठा योजनेचे कामच केले नाही. गावात जलवाहिन्या अत्यंत कमी खोलीवर अंथरण्यात आल्या आहेत. शिवाय पाण्याची चाचणीही घेण्यात आली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या कामांवर सध्याच्या स्थितीत १.३३ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊनही गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु आहे. सध्या वाढत्या उन्हात गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होत असून कोट्यावधी रुपयांच्या निधीचा काहीही उपयोग झाला नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. माळसेलू गावात पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी गावातील महिलांनी जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढला. प्रशासनाने गावात तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात अनिल नायक, मनोहर वामन, देवानंद भिसे, भिमराव भिसे, संतोष भिसे, जगन वामन, राहुल भिसे, अशोक भिसे, तुकाराम वामन यांच्यासह गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे निवेदन सादर केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



